Konkan Rain: रायगड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळून अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झालेली पहायला मिळतं आहे. रायगडमधील कर्जत, पाली, नागोठणे, कोलाड, रोहा, महाड पोलादपूर या तालुक्यांना पावसाने जोरदार झोडपून काढले आहे.  तसेच जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळी बाहेर गेल्या आहेत. अनेक सकल भागात पाणी साचून पूर परिस्थिति निर्माण झाली आहे. याचपार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


रोहा येथील कुंडलिका तर नागोठणे पाली येथील आंबा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोलाड येथे कुंडलिका नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. कोलाड येथिल रेस्क्यू टीमने पाण्यात अडकलेल्या अनेक नागरीकांना बाहेर काढले आहे. तिकडे पाली खोपिली पुलावरदेखील अंबा नदीचे पाणी आल्याने हा पुल वाहतूकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. वाहनांच्या या रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 


महाड शहरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा-


रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पात्रात वाढ झाल्याने आज सावित्रीने धोका पातळी गाठली आहे. महाड येथील भोई घाट परीसरात पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत आहेत. शहरातील नागरीकांना धोक्याची घंटा वाजवत महाड नगरपरिषदेकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली-


खेडामधील जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी खेड मार्केटमध्ये शिरले आहे. खेड नगरपरिषेदकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खेडामधील प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. 


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा-


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.


पुण्यात तुफान पाऊस-


पुणे जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात असून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्येही पावसाचा प्रचंड जोर आहे. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण (Pawna Dam) परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या बारा तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने अशी तुफान बॅटिंग केल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात अवघ्या 12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे. काल सायंकाळी 5 वाजता धरणाचा पाणी साठा 57.70 टक्के इतका होता, तो आता 67.80 टक्के झालाय. गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.


व्हिडीओ-