पुणे : नवऱ्यानं दुसरं लग्न केलं म्हणून पोटच्या पोराला एका महिलेने अक्षरशः पिशवीत कोंबल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. यात सुदैवाने पोलिसांच्या दामिनी पथकाने मोठी कामगिरी केली असून लहानग्या बाळाचे प्राण वाचवले आहे.
पुणे पोलिसांच्या दामिनी पथकातील या दोन महिला पोलीस नीलम पाचंगे आणि सारिका घोडके यांना कर्तव्यावर असतांना एक कॉल आला. त्यात एका महिलेने पिशवीत बाळाला टाकलं असून ती रस्त्यावर फिरत आहे प्लिज त्या बाळाला वाचवा म्हणून सांगितलं. या दोन्ही महिलां पोलिसांनी हडपसर परिसरातील मंतरवाडीच्या चौकात धाव घेतली. घटनास्थळी एक महिला भर चौकात बसलेली होती. त्या महिलेच्या आजूबाजूला मोठी गर्दी जमलेली होती. पोलिसांनी तातडीनं महिलेला खडे बोल सुनावत तिच्या हातातून पिशवी घेतली. त्यातून एका तान्हुल्याला बाहेर काढलं. अक्षरशः खराब अवस्थेत असलेल्या बाळाला या दोन महिला पोलिसांनी स्वच्छ केलं आणि महिलेसह पोलीस ठाण्यात आणलं.
पोटच्या मुलाबद्दल असं कुणी करणार नाही म्हणून पोलिसांनी चौकशी सुरू केली त्यात धक्कादायक बाब समोर आली. नशेत असलेल्या महिलेने आपल्या पतीने दुसरा विवाह केला म्हणून राग आला आणि त्यात मी असं केल्याची कबुली दिली. दामिनी पथकातील वरीष्ठ पोलिसांनी हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळले. बाळावर रुग्णालयात उपचारही केले. महिलेसह बाळाची आरोग्य तपासणी करून महिलेच्या भावाच्या स्वाधीन केलं गेलं.