Raj thackeray : आगामी काळात होणाऱ्या पुणे (Pune) महापालिकेच्या (Pmc) निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पुण्यात येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून नवी आणि वेगळी रणनिती आखण्याची सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील (Raj thackeray) पुण्यासाठी खास रणनीती आखली आहे. ते पुण्यात मनसेचे 3500 राजदूत नेमणार आहे.
राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी राजदूत नेमण्याच्या सूचना दिल्या आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार आहे. राजदूत ही नवी संकल्पना सुरु करणार आहे. या संकल्पनेमार्फत पुण्यातील प्रत्येक घरात मनसे पोहचवण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. काही दिवसात या सगळ्या राजदूतांची नेमणूक करण्यात येणार आहे.
राज ठाकरेंचा मेळावा होण्याची शक्यता
राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोघेही पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. दोघांनीही आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. दोघांनीही पुण्यात दौरे केले. नावनोंदणीची सुरुवात देखील पुण्यातून केली. मनसेत मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांचं इनकमिंग झालं. बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर आता पुण्यात राजदूतांची नेमणूक करुन पक्ष प्रबळ करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंचे पुण्याचे दौरे वाढले
राज ठाकरे सध्या सात्तत्याने पुणे दौरा करत आहेत. मनसेच्या सुरुवातीपासून त्यांनी नाशिक आणि पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यानंतर पुण्यात पहिल्याच वेळी 29 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर रमेश वांजळे आमदारही झाले होते. पुण्यातून आणि पुणेकरांकडून राज ठाकरेंच्या प्रचंड अपेक्षा आहेत. त्यात पुणेकरांनी देखील राज ठाकरेंची साथ दिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत देखील पुणेकरांकडून राज ठाकरेंच्या मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लावलं आहे. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. राजदूतांमुळे पक्षबांधणीचं काम सोपं होणार असल्याचं चित्र आहे.
शहराध्यक्षांना राजदूत नेमण्याबाबत सूचना
पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना राजदूत नेमण्याबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका करण्यात येणार आहेत. एक हजार मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितलं आहे.