Pune Roof Top Hotel : पुण्यातील (pune) रुफटॉप हॉटेलवर (Roof top hotel) कारवाई होत नसल्याने आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील लुल्ला नगर परिसरात काल (1 नोव्हेंबर) सातव्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला भीषण आग लागली त्यानंतर बेकायदेशीर चालणाऱ्या रुफ टॉप हॉटेलवर कारवाई होत नसल्याचं समोर आलं. महापालिकेकडून रुफ टॉप हॉटेलवर कारवाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष अनेक हॉटेल्स अजूनही सुरु असल्याचं चित्र आहे.
82 रुप टॉप हॉटेलला पालिकेकडून नोटिसा
पुण्यातील एकूण 82 रुप टॉप हॉटेलला पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे. त्यातील आतापर्यंत 39 हॉटेलांवर महापालिकेने कारवाई केली आहे. बाकी हॉटेलवर महापालिकेने अजूनही कारवाई केली नाही आहे. बेकायदेशीर चालणाऱ्या या हॉटेलवर अनेकदा आगीच्या घटना घडतात. त्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो.
लुला नगरयेथील हॉटेलवर 2019 मध्ये कारवाई
काल लुला नगर परिसरातील सातव्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला आग लागली होती. त्याच हॉटेलवर 2019 मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये 82 हॉटेलला नोटीसा बजावण्यात आल्या त्यात या हॉटेलचा देखील समावेश होता.
यापूर्वी अनेक हॉटेलवर कारवाई बाकी हॉटेलचं काय?
पुण्यात अनेक इमारतींवर रुफ टॉप हॉटेल्स बघायला मिळतात. रूफटॉप पब आणि बारवर विशेष लक्ष देऊन टेरेस किंवा इमारतींच्या छतावरील बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करणं आवश्यक आहे. यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या पब आणि बारचा किंवा रुप टॉप हॉटेलचा आधीच शोध घेतला होता आणि त्यांच्या मॅनेजरला लेखी पत्र देत त्यांनी याबद्दलची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत कारवाई करण्यात आली होती. मात्र काही हॉटेलवर अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. महंमदवाडी, कल्याणीनगर, येरवडा, कोरेगाव पार्क, बाणेर, पाषाण, कोथरूड, खराडी आणि शहरातील इतर भागात असलेल्या प्रसिद्ध रूफटॉप पब आणि बारला यापूर्वी नोटीसा बजावल्या होत्या आणि त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली होती.
तरुणांचं आवडतं ठिकाण बनतंय धोक्याचं
पुण्यातील अनेक परिसरात रुफ टॉप हॉटेल्स आणि बार आहेत. अनेक तरुण रुफ टॉप हॉटेलला पसंती देतात. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. अनेक तरुण मंडळीचं सध्या आवडीचं ठिकाण म्हणजे अनेक रुफ टॉप हॉटेल्स आणि बार झाले आहेत. तरुणांचा आवाज आणि राडा त्यात रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने गाण्याच्या आवाजाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारी दिल्या होत्या. यावेळी पोलिसांवर देखील नागरिक मंचाने आरोप केले होते. त्यानंतर रुफटॉप हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आहे. त्यातील फक्त काहीच हॉटेल्सकडे योग्य ते परवाने असल्याचं समोर आलं होतं.