Mhada Paper Leak Pune Police: म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काहीजणांना अटक होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक करण्यात आली. म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असूनदोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे. रात्री सुपेच्या घराची झडती घेतली तेव्हा 88 लाखांची रोकड सापडली. त्याशिवाय सोनेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
कसा करायचे टीईटीमध्ये घोटाळा
जी. ए. टेक्नॉलॉजीकडे भरती प्रक्रियेची जबाबदारी होती. शिक्षक पात्रता परिषदेत उत्तीर्ण होण्यासाठी पैसे दिलेल्या परीक्षार्थींना ओएमआर शिट रिकामी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. पेपर स्कॅनिंग करून तपासणी करण्याच्या वेळी ओएमआर उत्तरपत्रिका भरली जायची आणि उत्तीर्ण केले जायचे. या दरम्यानही काही परीक्षार्थी नापास झाल्यास त्यांना पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज करण्यास सांगितले जायचे आणि त्यात पास केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार, प्रत्येक परीक्षार्थीकडून 35 हजार ते एक लाख रुपये घेतले जात असत.
आणखीही काही घोटाळे समोर येणार?
म्हाडा पेपरफुटीवरून हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यामुळे भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले. पोलीस भरतीबाबत तक्रारी अथवा पुरावे सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले.