Mhada Paper Leak issue :

  म्हाडाचा पेपर फुटल्यानंतर आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.  हा पेपर फोडण्यासाठी आरोपींनी कोडवर्ड ठरवला होता. या कोड वर्डच्या माध्यमातूनच ते संभाषण करायचे. घर आणि वस्तू हा कोड वर्ड होता. घर म्हणजे महाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्या शब्दांचा वापर होता. संभाषण करताना ते 'घरातील वस्तू कधी मिळणार' या शब्दांचा वापर करीत होते. तपासादरम्यान पोलिसांना जे पुरावे मिळाले त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली..


त्यासोबतच ज्या दिवशी पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणी कारवाई केली त्यादिवशी आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या, त्यांना फोन करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करणार आहे. त्यादिवशी आरोपींच्या मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत अनेकांचे फोन येत होते. त्यामुळे हे फोन नेमके कोणाचे आहेत, त्यातील कुणी आरोपी आहेत का याचा तपास करण्यासाठी त्यांच्याकडे तपास केला जाणार आहे. फोन करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश असू शकतो असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना बोलावून आरोपी अशाप्रकारे पेपर फोडणार होते, त्यासाठी किती रुपयांचा व्यवहार ठरला होता, यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का त्याच्या तपासासाठी संबंधितांकडे चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घराची आणि कार्यालयाची पोलिसांनी आज झडती घेतली. आरोपींनी आणखी काही कागदपत्र, काही पुरावे घर किंवा कार्यालयात लपवलेत का यादृष्टीने ही झडती घेण्यात आली. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपींना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हाडाच्या पेपर कुट्टी प्रकरणात आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का? आणखी कुठल्या कोडवर्डचा वापर करण्यात आला होता का ? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 


म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन, प्रकरण असं घडलं...
औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. या परीक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणले. देशमुख ला अटक केल्यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या घोटाळ्याप्रमाणेच शहरातील दोन क्लासेसचे तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आले. परीक्षेचे कंत्राट असलेल्या आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याने संतोष हरकळ आणि अंकुश यांच्याबरोबर एकत्र येत लेखी निवड परीक्षेचे काम सोपवले होते. तिघेही सोबतच गाडीत पळून जात असताना पोलिसांनी पकडले असता त्यांच्याकडे पेपर आणि पेनड्राईव्ह आढळून आले.