Pune Crime News: पुण्यातील (Pune) हिंजवडी परिसरातून सुमारे 400 किलो चिकन आणि मटणाचे मांस गोळा करून ते पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील रावेत येथील वॉटर पंपिंग सेंटरजवळ टाकणाऱ्या एका टेम्पो चालकाला रंगेहात पकडण्यात आले. सुरक्षा रक्षकाने सतर्क होऊन चालकाला पकडले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून वाकड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.


नेमकं काय घडलं?
विठ्ठल साठे आणि उत्तरेश्वर शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून रावेत येथील महापालिकेच्या जलकुंभ केंद्राजवळ चिकन व मटणाचा कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे येत आहेत. रात्री उशिरा या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्य विभागाकडून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. पोलीसही परिसरात चोवीस तास गस्त घालत होते. परिसरात कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. परंतु नदीत कचरा टाकणाऱ्या मांसाचे डंपर सापडले नाहीत. सोमवारी रात्री रावेत येथील पवना नदी स्मशानभूमीतील केअरटेकरला नदीजवळ एक वाहन कचरा टाकताना दिसले. त्यांनी वाहनाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढली होती. व्हिडीओ आणि छायाचित्रांनंतर पोलिसांच्या सहकार्याने कचरा टाकणाऱ्या वाहनाचा आणि मालकांचा शोध घेण्यात आला.


अशा प्रकाराची ताबडतोब माहिती द्या!
हे वाहन हिंजवडीतून चिकन आणि मटणाचा कचरा गोळा करून महापालिका हद्दीत टाकून नदीत टाकत असल्याचे स्पष्ट झाले. या कृत्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेने या व्यक्तीविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहेशहरातील कोणत्याही भागात कचरा टाकताना दिसल्यास त्यांनी ताबडतोब पीसीएमसीला कळवावे. असे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी मोकळ्या जागेवर कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा आस्थापनेने कचरा टाकू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 269 , 270 ,आणि 277अंतर्गत गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदविला आहे.