पुणे : शिक्षणाने व्यक्तीमत्त्व सुधारते, समज येते असं म्हटलं जातं. पण कधी-कधी शालेय अभ्यास क्रमात हुशार असणारे विद्यार्थीही गुन्हेगारी करत असल्याचं समोर येतं. पुण्यात मेडिकल क्षेत्रात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी पुण्यातील नामांकित सराफा दुकानातून दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या दोघांना हडपसर पोलिसांनी अटकही केली आहे. दोघेही आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत असल्याचेही समोर आले आहे. यांच्यातील एकजण बी ए एम एस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



हडपसर येथील रांका ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघा तरुणांनी चोरी केल्याची तक्रार पोलिसात आली होती. 8 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता त्याच दिवशी कोथरूड परिसरातील एका ज्वेलर्स मधूनही दोन तरुणांनी अशा प्रकारे चोरी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून तांत्रिक तपास करत आरोपींना अटक केली. 

 

2.5 लाखाचे दागिने ताब्यात

 

अनिकेत हनुमंत रोकडे (वय 23) आणि वैभव संजय जगताप (वय 22) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी अशाप्रकारे चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या जप्त केल्या आहेत..

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha