Mumbai Crime News : लहानपणापासूनच आपण अनेक दंतकथा ऐकल्या आहेत. अनेक दंतकथांमध्ये एक रहस्यमयी आरसा असतो. जो क्षणार्धात इच्छा पूर्ण करतोच, पण अनेकदा आपल्याकडच्या जादुई शक्तीनं अनेक गोष्टी गायब करतो. अशीच काहीशी घटना घडली आहे, मुंबईतील अंधेरीत. या आरशानं अनेकदा मुंबई पोलिसांनाही गुंगारा दिला आहे. पण हा आरसा कोणता जादुई आरसा नाही, तर हा आरसा आहे अंधेरीतील दीपा बारमधील. 


मुंबईतील अंधेरी भागातील प्रसिद्ध असा दीपा बार. गेल्या अनेक दिवसांपासून या बारमध्ये राजरोसपणे डान्स बार सुरु असल्याची माहिती पोलिसांना वारंवार मिळत होती. पण जेव्हा जेव्हा पोलीस अंधेरीतल्या दीपा बारवर छापा मारायचे, तेव्हा तिथल्या बारबाला क्षणार्धात गायब व्हायच्या. 


बारमधील बाथरुम, स्टोरेज रुम, किचन संपूर्ण बारमधील काना-कोपरा शोधून काढला, पण पोलिसांना काहीच सापडलं नाही. सगळं शोधून झाल्यावर हतबल पोलिसांनी बारमधील मॅनेजर, कॅशियर, वेटर्सची तासन्तास चौकशीचा सपाटा लावला. परंतु, चौकशीतूनही काहीच समोर आलं नाही. पोलिसांनाही हे रहस्य काही उलगडत नव्हतं. मिळालेली माहिती खरी असूनही छापा मारल्यानंतर काहीच सापडत नव्हतं म्हणून पोलिसही कोड्यात पडले होते. .


पाहा व्हिडीओ : अंधेरीत बारवर छापा, मेकअप रुममधील आरशामागील छुप्या खोलीचा पर्दाफाश, 17 बारबालांना अटक



काल (रविवारी) देखील मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेनं दिपा बारवर छापा मारला. सुरुवातीला नेहमीप्रमाणेच पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. अखेर पोलिसांची नजर बारमध्ये लावलेल्या भल्या मोठ्या आरशावर खिळली. अन् मनात शंकेची पाल चुकचुकली. बारमध्ये लावलेल्या आरशाचा आकार गरजेपेक्षा जरा जास्तच मोठा असल्यानं पोलिसांना संशय आला. त्यांनी थेट आपला मोर्चा आरशाकडे वळवला. पोलिसांनी मोठ्या हातोड्याच्या सहाय्यानं तो आरसा फोडला. अन् पुढे जे पाहायला मिळालं ते खरंच खूप धक्कादायक होतं. 


दीपा बारमधील या भल्यामोठ्या आरशामागे बारबालांना लपवण्यासाठी छुपी खोली तयार करण्यात आली होती. तसंच पोलिसांचा छापा पडताच बारबालांना बाहेर पडण्यासाठी या आरशाआड भुयारी मार्गही तयार करण्यात आला होता. जवळपास 15 तास चाललेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी 17 बारबालांना अटक केली आहे. तसंच बारच्या मॅनेजरसह तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


दरम्यान, NGO कवचनं या बारसंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. बारवर पहिला आरोप हा होता की, कोविडच्या नियमांचं उल्लंघन करत आहे, दुसरा फक्त ऑर्केस्ट्राचीच परवानगी देण्यात आली आहे, ज्यामध्ये फक्त 4 लोक कायदेशीर असू शकतात आणि नृत्य नाही त फक्त गाणी लावण्यासच परवानगी आहे, परंतु यावेळी खुलेआम नृत्य करण्यात आलं आणि येथे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती, सध्या हा बार सील करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा