बारामती, पुणे : खासदार संजय राऊत यांच्या बारामती दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला आहे. दौंडमधील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत थांबले आहेत. या हॉटेलबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांकडून संजय राऊत विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संजय राऊत यांच्या दौऱ्यावेळीदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
यावेळी हॉटेलबाहेर शेकडो कार्यकर्ते जमले असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. कार्यकर्त्यांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरुच ठेवली आणि गावबंदी असताना राऊतांनी दौंडमध्ये पत्रकार परिषद घेतलीच कशी, असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच गावबंदी असताना ते दौंडमध्ये का आले, असंही म्हणत कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
ही परिस्थिती पाहून शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलखाली जाऊन मराठा आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांचा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही.तुम्हाला संजय राऊत येऊन आंदोलन स्थळी भेटणार आहेत, अशी समजूत शिवसेनेचे कार्यकर्ते मराठा आंदोलनकर्त्यांची काढत आहेत. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम असल्याचं दिसत आहे.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना राज्यातील अनेक गावात गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे गावागावात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर मराठा सामाजचं साखळी आंदोलन सुरु आहे. हे साखळी आंदोलन सुरु असतानाच या कार्यकर्त्यांना संजय राऊत या हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सगळे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा या हॉटेलकडे वळवला.
मराठा कार्यकर्ते म्हणाले की, संजय राऊत यांचं आणि आमचं काही भांडण नाही. त्यांनी आमच्या मोर्चाला मुक मोर्चा म्हणून संबोधलं. त्यानंतर गावबंदी असताना दौंडमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतात. ही त्यांची मोठी चूक आहे. त्यामुळे त्यांना विनंती आहे की पुढच्या पाच ते सात मिनिटात त्यांनी दौंडमधून निघून जा. नाहीतर मराठा समाजाच्या आक्रोशाला आणि रोषाला समोरं जाण्याची तयारी ठेवा आणि जर विश्रांतीसाठी आले असला तर मराठ्यांशी निदान चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी भेट द्या.
इतर महत्वाची बातमी :