पुणे : शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागामार्फत सर्व परवानग्या ऑनलाईन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासकीय योजनेच्या अंमलबजावणीचा शेवटच्या माणसाला लाभ होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंमलबजावणीतील अडचणींचा अभ्यास करून त्या दूर करणे तेवढेच महत्वाचे आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सीआयआय, विवेक स्पार्क फाऊंडेशन आणि पुना प्लॅटफॉर्म ऑफ कोलॅबरेटिव्ह रिस्पॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भानुबेन नानावटी महिला महाविद्यालयात आयोजित पश्चिम महाराष्ट्र विकास मंथन कार्यक्रमात ते बोलत होते.
विखे पाटील म्हणाले, राज्यातील 19 जिल्ह्यात दूध संकलन वाढविण्यासाठी शेतकऱ्याला 10 गायी देण्याची योजना आहे. बंद वाहिन्यांद्वारे शेतीला पाणी देण्यावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादक संस्थांना प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्याला अधिक लाभ होईल. स्मार्ट सारखे प्रकल्पांना 2 हजार 200 कोटी रूपयांची तरतूद असताना कमी प्रतिसाद आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता आहे.
रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांकडे वळणे आणि कृषी उत्पादनासाठी मूल्य साखळी विकसित करणे महत्वाचे आहे. शेतमाल निर्यातीच्या बाबतीत राज्याला चांगली संधी आहे. पश्चिम महाराष्ट्रात राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत सिंचनाच्या चांगल्या सुविधा आहेत. सिंचन सुविधांचा सुनियोजित वापर करून उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.विकास ही संकल्पना जीवनाला पोषक असणे गरजेचे आहे. विकासासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता जनतेचाही या प्रक्रियेत सहभाग आवश्यक आहे. त्यादृष्टीने परिषदेतील चर्चा उपयुक्त आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तीन टप्प्यात प्रक्रिया राबविण्यात येणार
उपक्रमात चर्चेसाठी 12 संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत. तीन टप्प्यात ही प्रक्रिया राबविण्यात येत असून विविध विभागात 2 प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. शासनाची धोरणे अधिक उपयुक्त होण्यासाठी विविध विभागातील तज्ज्ञांची मते या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहेत. प्रशिक्षणात भारतीय मूल्य आणि जनसहभागातून धोरणांची निर्मिती या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी उद्योग, समाज कल्याण,शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, जलव्यवस्थापन, पर्यावरण आणि जैवविविधता, साहित्य आणि संस्कृती, आरोग्य, कृषी, सामाजिक सुरक्षा, सहकार आधी विविध विषयांविषयी प्रातिनिधिक स्वरूपात सूचना केल्या.
इतर महत्वाची बातमी-