Supriya Sule In Purandar:पुरंदर तालुक्यातील (Purandar ) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी. मविआचे सरकार अशा बाबतीत तातडीने मदत करीत होतं. सत्ता ओरबाडून घेतली मात्र कामाची सुरुवात होताना दिसत नाही.अडीच महिने झालं सरकार बदललं पण अजून पालकमंत्री नाही आहे. मी मुख्यमंत्री यांना विनंती करते जस एका दिवसात 20 मंडळाच्या गणपतीला गेलात तसा एक दिवस आम्हाला द्या. आम्ही 20 गावात त्यांना नेतो. महाराष्ट्रात आता दोन मुख्यमंत्री हवे आहेत. एक मंडळात जातील आणि दुसरे मुख्यमंत्री मंत्रालयात बसून शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करतील, असं विधान खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केलं आहे. त्या पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये बोलत होत्या.


सुप्रिया सुळे आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताची सुप्रिया सुळेंनी पाहणी केली.  पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर, आंबळे यांगावासह अन्य गावातील शेतकऱ्यांच्या शेताला सुप्रिया सुळेंनी भेट दिली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली.


जे. पी. नड्डांनी संविधानाचा अपमान केला
जे. पी. नड्डांनी संविधानाचा अपमान केला आहे. हा देश संविधानानुसार चालतो. पुढच्या आठवड्यात निर्मला सीतारामन येत आहेत. त्यांनी हजार दोन हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांना जाहीर करावं . दोन हजार कोटी  जास्त नाहीत त्यांच्यासाठी किरकोळ आहेत. 5/10 कोटींचे पॅकेज त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावं. हा निधी द्यावा ही फार मोठी संधी आपल्याला आहे, अशी मागणी त्यांनी निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. काही दिवसात निर्मला सीतारमन या बारामती दौरा करणार आहेत. 



 विमानतळ पुरंदरलाच होईल
पुरंदरमध्ये विमानतळ व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे विमानतळ आम्हाला हवंच आहे. जागेवर थोडेसे मतभेद आहेत. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढू आणि विमानतळ हे पुरंदरलाच होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. पुरंदरच्या विमानताळासाठी जागा निश्चित केली होती त्या जागेला विरोध झाला. काही गावांची जागा आता निश्चित करण्यात आली आहे, त्या जागेसाठी मात्र गावकरी विरोध करत आहेत. त्यावर योग्य ती चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.


रस्त्यांचा प्रश्न गंभीर
पुण्यातील फुरसुंगी भागातील नागरिकांच्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन त्याबाबत रेग्युलर फॉलोअप सुरु आहे. नितीन गडकरींनी संसदेमधे देखील खड्ड्यांबाबतच्या धोरणाची माहिती दिलेली आहे. त्यांनी प्रामाणिकपणे ते राबवत आहेत.  अपघात कमी झाले पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या.