पुणे : पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. यावेळी त्यासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. दोन वर्षांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा डाव पुणेकरांच्या विरोधामुळे उधळला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून देखील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. कोणीही मागणी केलेली नसताना या बालगंधर्व  रंगमंदिराचा पुनर्विकास प्रेक्षक आणि कलाकारांसाठी होणार आहे की आणखी कोणासाठी हा प्रश्न यामुळे उभा ठाकला आहे. 


पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 54 वर्षांपूर्वी लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभं राहिलं. आपली कला सादर करण्याची एकतरी संधी बालगंधर्वला मिळावी हे प्रत्येक कलावंताचं स्वप्न असतं. मुरलीधर मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी  2018 सालीबालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली. या बालगंधर्व रंगमंदिराला नव्याने उभारण्याची, व्यापक करण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा या पुनर्विकासाला पुणेकरांसह राष्ट्रवादीनेही विरोध केला होता. त्यातच कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीतमध्ये हा विषय काही वेळ बाजूला राहिला. परंतु आता बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा विषय समोर आला आहे.



पुनर्विकासानंतर कसं असेल बालगंधर्व रंगमंदिर?
सध्या केवळ 500 फुटाचं कलादालन उपलब्ध असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या नव्या वास्तूमध्ये आता सुसज्ज अशी 10 हजार फुटांचे एक आणि प्रत्येकी पाच हजार फुटांची दोन अशी तीन नवीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. शिवाय यात पु. ल. देशपांडे आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या 54 वर्षांच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरुपी जतन करण्यात येणार आहेत.


पुण्यातील इतर नाट्यगृहांची पुनर्विकासाच्या नावाखाली बट्ट्याबोळ
दरम्यान बालगंधर्व रंगमंदिराच्या आधी पुण्यातील इतर नाट्यगृहांची पुनर्विकासाच्या नावाखाली अक्षरश: वाट लावण्यात आली आहे. कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली समोरच्या बाजूला तीन मजली पार्किंग बांधण्यात येत आहे तर नवीन इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेल्याचं दिसून येते. अस्वच्छता आणि दुर्गंधी तर इथे कायमच असते. आहे त्या नाट्यगृहांची नीट निगा राखली जात नसताना नवीन नाट्यगृहे  उभारली जात आहेत किंवा त्यांचा पुनर्विकास कोणासाठी केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


पुण्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील कोट्यावधी रुपयांची साऊंड सिस्टीम काही महिन्यांपूर्वी चोरीला गेली. त्यामुळे आता या नाट्यगृहात जर कोणाला कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर स्वतःची साऊंड सिस्टीम आणावी लागते. याचा परिणाम इथल्या बुकिंगवर आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलावर झाला आहे. पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांची ही अशी अवस्था असताना बालगंधर्व रंगमंदीर पाडून नव्याने बांधण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. जी 14 नाट्यगृहे आज पुण्यात आहेत त्यांची निगा राखणं महापालिकेला जमत नसताना नव्याने तीन नाट्यगृहांची भर त्यामध्ये का टाकायची असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.