शिरुर, पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव  पाटील  (Shivaji Adhalrao Patil)  यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. अखेर आढळराव पाटलांनी आपल्या हाती घ़ड्याळ बांधलं आहे. ते शिरुर लोकसभा मतदार संघाचे  (Shirur Lok Sabha Constituency) उमेदवार असतील. येत्या 28 मार्चला त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आढळराव पाटील यांच्यासोबत शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घड्याळ बांधलं आहे.  मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश झाला. 


शिवाजी आढळरावांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची फौज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाली आहे. सगळ्यांनी अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. शिरुरमध्ये आता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी तगडी लढत बघायला मिळणार आहे. ही लढत अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे अजित पवार या मतदारसंघात मोठी ताकद लावणार असल्याचं दिसत आहे. 


फेसबूक प्रोफाईलमध्ये घड्याळ!


काहीच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळरावांनी फेसबुक पेजमध्ये बदल केला आहे. आढळरावांनी फेसबुक पेजवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह टाकलं आहे. "जनता हीच माझी ताकद, काम हीच माझी ओळख" असं ब्रीद त्यांनी यावर नमूद केलेलं आहे. फेसबूक पेजवर त्यांनी पोस्ट केली आहे. 'महायुती सरकारच्या नेतृत्वासह, विकासाचे नवे शिखर गाठण्याचा हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. महायुतीच्या सशक्त मार्गदर्शनाखाली, देश उन्नतीची नवी झेप घेण्या साठी सज्ज आहे. या प्रवासात माझी जनता माझ्या पाठीशी खंबीर पणे उभी राहील अशी मला खात्री आहे', असं त्यांनी फेसबूक पोस्ट मध्ये लिहिलं आहे.



कोण आहेज शिवाजी आढळराव पाटील?


-खासदार अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता. 


-अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढली होती.


-आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 


-शिवाजी आढळराव पाटील हे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. 


-ते मूळचे आंबेगाव तालुक्यातील आहेत. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 


-2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. 


-2004, 2009 आणि 2014 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. 


-सलग तीन वेळेस त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. मात्र 2019 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar On Baramati Lok Sabha Election : बारामतीचा उमेदवार तुमच्या मनातलाच असेल; अजित पवारांचं सूचक वक्तव्य