पुणे : काही दिवसांतच लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024)  होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातही (Maharashtra Politics) सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातल्या त्यात लोकसभा निवडणुकांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency) चर्चेत आला आहे. त्यातच आता या शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील  (Shivajirao Adhalrao  Patil)) राष्ट्रवादीचा घड्याळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढणार आहे. आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असणार असल्याचं बोललं जात आहे. 


शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असं म्हणत असा चंग अजित पवारांनी बांधला आहे. या मतदार संघावरुन महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आत आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 


शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटलांवर 2009 आणि 2014 साली मतदारांनी विश्वास टाकला. हॅट्रिक मारलेल्या आढळरावांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासोबत शर्यत झाली. अपेक्षेनुसार कोल्हेंनी बारी मारली. मात्र आता पुणे जिल्ह्यावर प्राबल्य असणाऱ्या अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पराभूत कऱण्याता निर्णय घेतला आहे.  2009-2014 असे सलग दोन लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय खेचून आणला होता. आता अजित पवारांसोबतच जाऊन पुन्हा शिरुर काबीज करण्याच्या  तयारीत आहेत. 


काहीच दिवसांपूर्वी दिले होते प्रवेशाचे संकेत


काही दिवसांपूर्वी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आढळरावांनी म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही, असं थेट सांगितलं होतं. शिवाय महायुतीत चिन्हाची देवाणघेवाण होते. यापूर्वीदेखील असे प्रकार झाले असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवार गटात जाण्याचे संकेत दिले होते.  शिवाय भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लढले आहेत आणि त्यांच्या चिन्हावर देखील लढले आहेत. त्यामुळे तसे आदेश मला देण्यात आले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमी मला तसं सांगितलं तर त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही, असंही त्यांनी काहीच दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता ते अजित पवार गटातून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. 


आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे लढत


आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश कऱणार असल्याने आता आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी तगडी लढत बघायला मिळणार आहे. त्यामुळे बारामती नंतर आता शिरुर लोकसभा मतदार संघाकडेही महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचं लक्ष असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? कोणाला किती जागा मिळणार?