पिंपरी चिंचवड : नेपाळमधील एका चिमुकल्याच्या पोटात मृत गर्भ आढळल्याने खळबळ उडाली. आईच्या पोटात दोन गर्भ होते, त्यापैकी एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या दीड वर्षाच्या या मुलावर पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. साधारण अर्ध्या किलोचे हे मृत गर्भ होते अशी माहिती डॉ डी वाय पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. पाच लाख बालकांमागे एखाद्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते. जगभरातून आतापर्यंत दोनशे अशी प्रकरणं नोंदली गेली आहे. याला वैद्यकीय भाषेत 'फिट्स इन फिटू’ (fetus in fetu) असे म्हणतात.


नेपाळच्या महिलेची अठरा महिन्यांपूर्वी प्रसुती झाली होती. जन्मलेल्या मुलाला नेहमीच आरोग्याला घेऊन तक्रारी असायच्या, पोटात दुखायचं, अलीकडं तर त्याचं पोट गरोदर महिलांप्रमाणे वाढू लागलं होतं. त्यातच परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी उपचारासाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल झाल्या. तेव्हा बालरोग तज्ज्ञ डॉ. शैलजा माने यांनी अपेक्षित सर्व चाचण्या करुन घेतल्या तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. आईचा पोटात दोन गर्भ तयार झाले होते, त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. पुढे जन्मानंतर ही बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत गेली, त्यामुळे बाळाला योग्य आणि पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे हे मृत गर्भ (गाठ) शरीराबाहेर तातडीने काढणे गरजेचे होते. पाच लाख बालकांमधून एक अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार 200 अशी प्रकरणे आजपर्यत नोंदवली आहेत. यासाठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागणार होती, यासाठी काही तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आल्याचं डॉ माने म्हणाल्या. 


सोनोग्राफी आणि सी टी स्कॅन अहवालाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार हा गर्भ बाळाच्या यकृत आणि उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध असून तो मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आले. हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले. त्यामुळे ही गाठ वेगळी करणे हे फार मोठे आव्हान बाल शल्यचिकित्सकांसमोर होते. मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत, मूत्राशय आणि आतडे ह्या अवयवांना कोणतीही इजा होऊ न देता, ही संपूर्ण गाठ काढण्यात यश आलं. यासाठी बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव आणि त्यांच्या टीमने सहा तास शर्थीचे प्रयत्न केले. 
   
शरीराबाहेर काढलेल्या गर्भ गाठीचे परीक्षण करण्यात आले असून या गाठीमुळे बालकाला भविष्यात कोणताच धोका आणि दोष होणार नसल्याचे स्पष्ट झाले. या गर्भ गाठीचे वजन 550 ग्रॅम असून हात आणि पायची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोपमध्ये इतरही अवयव दिसून आले. यावरुन हे 'फिट्स इन फिटू' असल्याचे निदान झाले. हे बाळ आता इतर बालकाप्रमाणे सामान्य जीवन जगू शकते. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले असून रुग्णाच्या आई-वडिलांनी रुग्णालयाचे आभार मानले.