पुणे: राज्यात पुन्हा एकदा थंडी जाणवू लागली आहे, गेल्या आठवडाभरात राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णता, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण असं संमिश्र वातावरण दिसून आलं. मात्र, आता पुन्हा राज्यात गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात पुन्हा घट होताना दिसत आहे. पुणे आणि मुंबईच्या तापमानातही मोठी घसरण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गारठा वाढल्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत, तर पुढील दहा दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात गारठा आणखी वाढू शकतो.
पुढील 5 दिवसात पुण्यात आणखी हुडहुडी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात आज 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर येत्या काही दिवसात पुण्याचे तापमान आणखी घसरून दहा अंशावर जाण्याची शक्यता आहे. मुंबईतही पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आजपासून शहराचे तापमान घटणार
पुणे शहरात उत्तर भारतातून शीतलहरी सक्रिय होत आहेत. त्यामुळे पहाटेच्या तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून (मंगळवारपासून) (दि. 10) शहराच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील किमान तापमान सोमवारी 16.4 अंशांवर होते. यात आज (मंगळवार) पासून घट होत जाईल आणि 13 डिसेंबरपासून पारा 10 अंशांखाली जाईल. अशीच थंडी पुढे 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आजचे तामपान... शिवाजीनगर 33 (16.4), पाषाण 31(16.3), लोहगाव 33(17.6), चिंचवड 33 (19.3), लवळे 33 (19), मगरपट्टा 32(21), एनडीए 32(14.9), कोरेगाव पार्क 33(20) आजचा अंदाज आकाश निरभ्र राहील. पहाटे दाट धुके व थंडी पडेल, असा अंदाज आहे.
नाशिकचा पारा गेला 8 अंशांवर
उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील तपमानात घट झाल्यान नाशिककर गारठले आहे. निफडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत पार दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसतोय. शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेत आहेत. रब्बी पिकांना थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत गारठा वाढला
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे.सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी 13.7 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत.आज मुंबईत किमान तापमान हे 23 अंशांपर्यंत जाईल. तर कमाल तापमान 28 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
रायगडमध्ये तापमान 18 अंशांवरून थेट 12 अंशावर
फेंगल चक्रीवादळाच्या चाहुलीनंतर रायगड मध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता कडाक्याची थंडी पुन्हा सुरू झाली असून 18 अंश सेल्सिअस वर असणारे रायगडचे तापमान थेट 12 अंशावर घसरले आहे. हवेतील आर्द्रता कमी झाली असून कोरडेपणा वाढल्याने रायगड करांना स्वेटर आणि शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.