Pune Corona Vaccine:  केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली. तर आज आणखी सव्वालाख डोस पुण्यासाठी उपलब्ध होतील. कोरोना (Corona) लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 


सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्याचा अधिक लसींची गरज आहे, यात कुणाचंही दुमत नाही. पण, त्यातच मुंबई आणि इतर शहरांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असताना लस पुरवठ्याच्या बाबतीत पुण्याला प्राधान्य देत केंद्रानं दुजाभाव केला आहे का, असा सवाल महापौर मोहोळ यांच्या ट्विटर पोस्टनंतर उपस्थित केला गेला. 


दरम्यान, शुक्रवारी रात्री मुंबईसाठी 99 हजार कोरोना लसींचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले. लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता दोन दिवस पुरेल इतका लसींचा साठा मुबंईला उपलब्ध झाला आहे. 


एबीपी माझानं लसीकरण केंद्रावरुन घेतलेल्या आढ्याव्यानंतर आता मुंबईत कोविशील्ड लसीचे डोस पोहोचल्याची माहिती आहे. असं असलं तरीही हा पुरवठा पुढील दोन दिवस पुरेल इतकाच आहे. सध्या मुंबईमध्ये दिवसाला जवळपास 50 हजार नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. त्यामुळं लसीचा तुटवडा हा पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे. 


Breaking News LIVE : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरु 


मुंबईत शुक्रवारी रात्री उशिरानं लसीचा पुरवठा करण्यात आल्यामुळं मोजक्या लसीकरण केंद्रावर शनिवारी दुपारी बारा वाजल्यानंतर लसीकरण प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर सुरु असणारं लसीकरण अद्यापही ठप्पच असणार आहे. प्राधान्यानं जम्बो लसीकरण केंद्रांवर लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्यामुळं त्यानंतर उरलेल्या लसी खासगी लसीकरण केंद्रांवर पोहोचवण्यात येणार आहेत. 






पुण्यातील महापौरांचा दावा खरा, की...?


पुण्याच्या महापौरांनी ट्विट करत पुणे शहरासाठी कोरोना लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मात्र 1 लाख लसीच पुणे जिल्ह्यासाठी पोहोचल्या. यात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर इतरही जिल्ह्यांसाठी लसींचा पुरवठा करण्यात आला. सातारा जिल्ह्यासाठी 35 हजार, सोलापूर जिल्ह्यासाठी 17 हजार अशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या लसींमध्ये काही भाग हा ग्रामीण भागासाठीही राखीव असणार आहे. ज्यामध्ये 30 हजार शहरासाठी आणि 20 हजार डोस पिंपरी चिंचवड शहरासाठी देण्यात येणार आहे. परिणामी ज्या प्रक्रियेनं लसींचा पुरवठा करण्यात आला होता, तीच प्रक्रिया पुन्हा अवलंबण्यात आली आहे. इथं महत्त्वाची बाब अशी, की राज्य शासनाकडूनच हा लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळं महापौरांचा दावा एका अर्थी फोल ठरत आहे.