पुणे : राज्यात  कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची  संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत.  पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून  ( 9 एप्रिल)  करण्यात येणार आहे. या संदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 



काय आहेत वीकेंड लॉकडाऊनचे नियम?



  • वीकेंड लॉकडाऊन मध्ये दूध केंद्र (सकाळी 6 ते  सकाळी 11) सुरू राहणार

  • वैद्यकीय सुविधा सुरू राहणार 

  • भाजीपाला दुकान / मंडई बंद

  • हॉटेल, बार, रेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल सेवा मिळणार 

  • स्विगी आणि झोमॅटो यांच्यामार्फत पार्सल सेवा सुरू राहतील

  • सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मद्य विक्रीचे दुकान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे घरपोच सेवा देणार

  • घरेलू कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरीक, वैद्यकीय मदतनीस यांना सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवास करता येईल

  •  स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मेस मधून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल घेता येणार 

  • सार्वजनिक वाहतूक सेवा (PMPML)अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार 

  • मात्र ओला आमि उबेर यासारख्या टॅक्सी सेवा अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहणार आहे.

  • कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवास करताना  कोरोना निगेटिव्ह RTPCR  प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार तसेच त्यांना Rapid Antigen Test च्या प्रमाणपत्र देखील बाळगण्यास परवानगी आहे. 

  • कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरू राहणार


राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता! 


 राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत आज मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.