Pune Crime News : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने तिच्या आईला संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. प्रेयसीची आई त्यांच्या नात्याच्या विरोधात होती, त्यामुळेच दोघांचं ब्रेकअप झालं होतं. हाच राग मनात धरुन त्याने प्रेयसीच्या आईला संपवलं. ही घटना ऐकून परिसरात खळबळ उडालीच, पोलिसही (Police) चक्रावले आहेत. पाषाणमध्ये सूस रोडजवळच्या एका सोसायटीमध्ये हा सर्व प्रसंग घडलाय. मृतक महिला मुलीसोबत राहत होती. 1 जानेवारी 2024  रोजी पतीचं निधन झालं होतं. मृत महिलेच्या मुलीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या आरोपीला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. एकाच महिन्यात त्या मुलीने आई आणि वडिलांना गमावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


डेटिंग अॅपवर ओळख, प्रेमाला सुरुवात - 


पुणे मिररच्या रिपोर्ट्सनुसार, पाषणच्या सूस रोडच्या माउंटवर्ट अल्टसी सोसाइटीमध्ये वर्षा क्षीरसागर (58) मुलगी मृण्मयी क्षीरसागर (22) हिच्यासोबत राहत होती. मृण्मयी कम्प्युटर इंजिनिअर आहे. एक जानेवारी रोजी मृण्मयीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर तिने नोकरी सोडली होती. सात महिन्याआधी मृण्मयीची डेटिंग अॅपद्वारा शिवांशू दयाराम गुप्ता (23) याच्यासोबत ओळख झाली होती. पहिल्या भेटीमध्ये दोघांना एकमेंवर प्रेम जडलं होतं. काही महिन्यापूर्वी याबाबत शिवांशू डिलिव्हरी बॉय असल्याचं मृण्मयीला समजलं. 


आईचा सल्ला, प्रियकरासोबत ब्रेकअप - 


शिवांशु दयाराम गुप्ता पुण्यातील येरवडा येथे राहतो. तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही त्याला रोजगार मिळाला नाही. त्यामुळे त्याने डिलिव्हरी बॉयचं काम सुरु केले. डेटिंग अॅपवर त्याची आणि मृण्मयीची ओळख झाली होती. पण मृण्मयीची आई या नात्याच्या विरोधात होती. शिवांशुची नोकरी आणि आर्थिक स्थिती बरोबरीची नसल्याचं ती समजत नव्हती. त्यामुळे तिने मृण्मयीला या नात्यातून बाहेर येण्याचा सल्ला दिला होता. वडिलांना गमावलेल्या मृण्मयीने आईचं म्हणणं मानलं अन् शिवांशुसोबत ब्रेअकअप केले. त्याला भेटणंही बंद केले.   


ब्रेकअपचा राग, प्रेयसीच्या आईचा खून - 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाराज प्रियकर शिवांशु गुप्ता एका रात्री मृण्मयीच्या घरी पोहचला. आई त्याला ओळखत होती, तिने त्याला घरी घेतले. घरात गेल्यानंतर शिवांशु गुप्ता याने लग्नासाठी वर्षा क्षीरसागर यांना मनवण्याचा प्रयत्न केला. पण वर्षा यांनी त्याचं ऐकलं नाही. त्यानंतर त्याने रागाच्या भरात बेल्टने वर्षा यांचा गळा आवळून खून केला.  या हत्येवेळी मृण्मयी घटनास्थळी उपस्थित होती की, नाही याबाबत अद्याप समजलं नाही. वर्षा यांचा खून केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मृण्मयीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. आरोपी खून केल्यानंतर घरी जाऊन लपला होता. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. या खूनामध्ये मुलाचा सहभाग आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहेत.