Pune Crime : दिघी परिसरात कुरिअर फर्मच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा सापडला असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 


92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त


पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून तलवारी जप्त केल्या आहेत. 3.7 लाख रुपये किंमतीच्या 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त केले आहेत.  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता, मात्र पोलीसांनी सापळा रचत याठिकाणी मोठी कारवाई केली आहे. 


 






गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आला होता शस्त्रसाठा


औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाइन तलवारी खरेदी मागविणाऱ्यासह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी अटक करून आणखी 3 तलवारी जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिस चौकशीत या आरोपीने यापूर्वीही तलवारी खरेदी केल्याचे मान्य केले आहे. यातील एक तलवार त्याच्या घरात तर दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले होते. यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आठवड्यात क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेतले होते.