Pune Crime news :  पुण्यात (Pune News) आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी (MPSC) करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला (Crime News) केला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत ही घटना घडली आहे. आधी दर्शना पवार हत्या प्रकरण (Darshana Pawar Murder Case) आणि त्यानंतर समोर आलेली ही घटना यामुळे भावी अधिकारी गुन्हेगारीच्या गर्तेत अडकतायत की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


पुण्यातील वर्दीळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. ज्यावेळी तरुणानं त्याच्या मैत्रिणीवर कोयत्यानं हल्ला केला, त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही होता. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली. तिचा मित्र कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती उपस्थितांकडे मदतीसाठी याचनाही करत होती. पण तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही.   


काही काळानं एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणानं कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखलं. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे.


उपस्थितांनी घेतली बघ्यांची भूमिका...


ही सगळी घटना घडत असताना अनेकांंनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर एका मुलानं प्रसंगावधान दाखवत हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावला आणि त्यामुळे तरुणीचा जीव वाचला. आज जर तो मुलगा नसता तर माझी मुलगी वाचली नसती, अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने दिली आहे. हल्लेखोर मुलगा आपल्या मुलीला त्रास देत आहे. तिचा तो सतत पाठलाग करत होता, यासंदर्भातील माहिती आईला होती. तो तरुणीला वारंवार धमकीदेखील देत होता, याबाबतदेखील माहिती असल्याचं हल्ला झालेल्या तरुणीच्या आईनं सांगितलं. पुण्यासारख्या शहरात जर मुलींंवर दिवसाढवळ्या असं हल्ले होत असतील तर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातून बाहेर निघालेल्या मुली घरी येतपर्यंत मनाला घोर लागलेला असतो. त्यामुळे मुली कधी सुरक्षित असणार? असा सवालही तरुणीच्या आईने व्यक्त केला आहे. 


लेशपाल जवळगेमुळे मुलीचा जीव वाचला..


तरुणीला वाचवरणारा तरुण हा लेशपाल जवळगे, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. हा पण पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करते. तो रोजचं काम आटपून अभ्यासिकेत निघाला होता. रस्त्यात त्याला एक तरुणी पळताना दिसली. त्यामुळे त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि तरुणीचा जीव वाचवला.