Abdul Sattar Baramati : पवारांची पावर अशीच राहो, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलं आहे. बारामतीत आज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मी याठिकाणी कृषिमंत्री म्हणून आलो आहे. राजकीय पुढारी म्हणून आलो नाही, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांची पावर अशीच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असंही ते म्हणाले.
जुनी शेती नवीन करण्याचे काम शरद पवारांनी केलं
सत्तार म्हणाले की, बारामतीत खूप चांगलं कृषी प्रदर्शन भरवलं आहे. 2023 सालातील हे सगळ्यात चांगले प्रदर्शन आहे. कृषी प्रदर्शनामध्ये फोटो असतात आणि लिहिलेली माहिती असते मात्र या प्रदर्शनात डेमो पाहायला मिळत आहे. या ठिकाणी असलेली शेती बघितल्यानंतर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार यांचे शेतीमध्ये असलेलं योगदान पाहायला मिळत आहे. जुनी शेती नवीन करण्याचे काम शरद पवारांनी केलं, असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबियांचं कौतुक केलं.
या कृषी प्रदर्शनात तंत्रज्ञान वापरून कशी शेती केली जाते, याचे प्रात्यक्षिक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने बारामतीत येऊन हे प्रदर्शन बघायला हवं आणि त्याचे अनुकरण करायला हवं. अशा प्रदर्शनात अनेक संशोधन बघायला मिळतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे शेतात नवे प्रयोग करणं सोपं जातं. त्यासोबतच खाजगी विद्यापीठ आणि सरकारी विद्यापीठ यातील फरक करतील स्पष्ट झाला पाहिजे. सरकारी विद्यापीठ काय करतात? आणि खाजगी विद्यापीठ काय करतात. यातील फरक स्पष्ट होईल. ज्या गोष्टी पाहायला मिलेल्या त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रदर्शन राज्यात अनेक ठिकाणी भरवण्यात यावे , असंही ते म्हणाले
19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार
170 एकरवर या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असं अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. कृषि प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज' या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना, उद्योजकांना दाखवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन 19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे.