Pune Black Magic news : विद्येच्या माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात  (Superstion) जादूटोणा करुन अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी आणि मूल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची (Black magic) अघोरी पूजा केली आहे. पुण्यातील सिंहगड रोजवरील धायरी परिसरात हा प्रकार घडला आहे. 


पत्नीला आरोपी पती तसेच घरातील इतर जण संगनमत करुन शारीरिक आणि मानसिक छळ करुन वारंवार मारहाण करुन शिवीगाळ करायचे. पुणे शहरातील धायरी भागात हा प्रकार 2019 पासून सुरु होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सासरच्या कुटुंबातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावे आहेत. 


घराची भरभराट आणि संतती प्राप्तीसाठी अघोरी पूजा


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेकडे लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. याबरोबरच सासरचे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे. घरात भरभराटी व्हावी तसेच महिलेला मुलगा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून अघोरी आणि जादूटोणा करुन पूजा देखील घातली होती. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय दंडात्मक कलम 498 (अ), 323, 504 /2, 34 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम 3 अंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वैकुंठ स्मशानभूमीत तृतीयपंथीयांकडून चितेजवळ अघोरी प्रकार


यापूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत  थरारक प्रकार समोर आला होता. दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. चितेजवळ फोटो, लिंबू, सुया आढळले आहेत. या प्रकरणी जादूटोणा करणाऱ्या दोन (Pune police) तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. 


जादूटोण्याबाबत तक्रार करण्याचं आवाहन


परिसरात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.