Maharashtra Politics Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अनेकदा टीका करताना विरोधकांकडून 1978 मधील खंजीर प्रकरणाचा उल्लेख केला जातो. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shide) यांनी मात्र, त्या प्रकरणावरून शरद पवार यांच्यासाठी कौतुकोद्गार काढले आहेत. शरद पवार यांनी वसंतदादा यांचे सरकार पाडले नसते तर पवार ही काय चीज आहे, हे देशाला समजलेच नसते असे त्यांनी म्हटले.  


पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


पुरस्कार सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे यांनी आयोजकांचे आभार मानले. आपल्या भाषणा त्यांनी म्हटले की, 1978 ला शरद पवार यांनी वसंतदादा यांच सरकार पाडून स्वतःच सरकार बनवले नसते तर शरद पवार ही काय चीज आहे हे देशाला समजलेच नसते. 


शरद पवार यांनी या पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना मिश्किल टिप्पणी केली. पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे ही ठाराविक मंडळी असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये  रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार  ही नावे पुरस्कार मिळवणार्‍या व्यक्तिंच्या यादीत असतात. पुरस्कार ठरवणारे देखील उल्हास पवार, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला हे लोक असतात, असेही पवार यांनी म्हटले.


त्यावेळी डोळ्यातून पाणी आले


शरद पवार यांनी या पुरस्कार सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे यांच्याशी निगडीत एक किस्सा उपस्थितांना सांगितला. सुशीलकुमार शिंदे यानी मी सांगितल्यावरून पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. पण, तिकीट मिळवून देऊ शकलो नाही तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले असल्याचे पवार यांनी सांगितले. त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री झालो होतो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील म्हणून जबाबदारी दिली होती. काही प्रकरणे शिंदे यांना देण्याचे ठरवले होते. मात्र, त्या पुढील निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना निवडणुकीचे तिकिट मिळवून देण्यात यशस्वी झालो. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी मागे वळून पाहिले नसल्याचे सांगत पवार यांनी त्यांचे कौतुक केले.