Pune : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. दिवाळी सणाच्या निमित्तानं स्नेहभोजनासाठी पवार कुटुंब प्रतापराव पावर यांच्या घरी एकत्र भेटल्याची माहिती मिळत आहे. या भेटीबाबत शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील (Saroj Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. ही भेट राजकीय नव्हती. कौटुंबीक भेट होती असे मत सरोज पाटील यांनी व्यक्त केलं.
शरद पवार यांनी मला छान भेट दिली
आम्ही सर्वजण एकत्र आल्यावर विनोद करतो, एकमेकांची मस्करी करतो असे सरोज पाटील म्हणाल्या. अजित पवार यांची तब्बेत चांगली असल्याचे पाटील म्हणाल्या. खुप दिवसानंतर एकत्र भेटलो आम्हाला खूप आनंद झाल्याचे सरोज पाटील म्हणाल्या. सगळी भावंड मुली एकत्र भटलो. आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवसही असल्याचे सरोज पाटील यांनी सांगितले. आज राजकारण सोडून बोला असंही सरोज पाटील प्रसारमाध्यमांना म्हणाल्या. शरद पवार यांनी मला छान भेट दिल्याचेही सरोज पाटील म्हणाल्या. आजच्या या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्या म्हणाल्या. अजित पवार लवकर गेले कारण, त्यांना काहीतरी कार्यक्रम असेल असे सरोज पाटील म्हणाल्या.
जयंत पाटील म्हणाले, त्याबद्दल मी काय बोलणार?
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबियांनी काय करावे हे त्यांचा मुद्दा आहे. त्याबद्दल मी काय बोलणार? मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला. कोणी कोणाला भेटावे याबद्दल मी काय बोलू, असं जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार हे पुण्यात आहेत. सकाळपासून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीसाठी येत होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील शरद पवार यांची सकाळी भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार हे प्रतापराव पवार यांच्या घरी रवाना झाले होते. यावेळी अजित पवारही प्रतापराव पवार यांच्या घरी होते. संपूर्ण पवार कुटुंब याठिकाणी होते. दिवाळी सणाच्या निमित्तानं स्नेहभोजनासाठी एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत.