Dilip Walse Patil : शरद पवार साहेबांची (Sharad Pawar) भेट घेतल्यामुळं कोणताही संभ्रम होण्याचं कारण नाही. कारण शरद पवारसाहेब हे विविध संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी वेळोवेळी भेट घेत असल्याचे वक्तव्य राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केलं. आज रयत शिक्षण संस्थेसंदर्भात शरद पवार यांची भेट घेतल्याचे वळसे पाटील यांनी सांगितलं. संस्थात्मक राजकारणामध्ये अंतिम शब्द शरद पवार यांचा की अजित पवार यांचा असा सवाल वळसे पाटलांना करण्यात आला, यावेळी अंतिम शब्द शरद पवार यांचाच असल्याचे वळसे पाटील म्हणाले. आज वळसे पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते.
शरद पवार यांच्यासोबत 'या' विषयांवर झाली चर्चा
शरद पवार यांची मी घेतलेली भेट ही पूर्वनियोजीत होती. माझ्यासोबत यावेळी रयत शिक्षण संस्थेच पदाधिकारी देखील होते. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात चर्चा झाल्याचे वळसे पाटील म्हणाले. संभ्रम होण्याचे काही कारण नाही. रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य साखर कारखाना संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ या संस्थामध्ये मी काम करतो. या संस्थामध्ये काम करत असताना आत्तापर्यंत शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन घेत आलो. यापुढेही त्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले. या संस्थांचा कारभार पुढे नेण्याचे संदर्भात, सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे वळसे पाटील म्हणाले. राज्यात दुष्काळी परिस्थिती संदर्भात सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. ते निर्णय साहेबांच्या कानावर घातल्याचे वळसे पाटील म्हणाले.
राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न, संस्था या समाजाच्या
राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे. संस्था या समाजाच्या आहेत. तिथं कधीही पवारसाहेबांनी राजकारण आणले नाही. सगळ्या संस्थांमध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. त्यामुळं इथं वेगळ वाटण्याचे काही कराण नसल्याचे वळसे पाटील म्हणाले. संस्थात्मक राजकारणामध्ये अंतिम शब्द शरद पवार यांचाच असल्याचे वळसे पाटील म्हणाले. पवारसाहेब अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यामुळं त्यांचाच अंतिम शब्द असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. सध्या विद्यमान सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची राजकारणात ओळख आहे. शरद पवारांचे खंदे शिलेदार अजित पवार गटात गेल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राष्ट्रवादीतील फुट पडल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळं वळसे पाटील हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत गेल्याची माहिती मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
Dilip Walse patil Meet Sharad Pawar : वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, दिवाळी शुभेच्छा की अन्य काही, राजकीय चर्चांना उधाण