Pune ST :  एसटीमध्ये महिलांना तिकीटावर 50 टक्के सूट देण्यात Maharashtra ST Bus News आली आहे. त्याला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी अनेक महिलांनी अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्यासाठी गर्दी केली होती. राज्याच्या 2023-24  च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महामंडळाने 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजना सुरु केली. यात 23 मार्चपर्यंत पुणे विभागातील बसेसमधून एकूण 3 लाख 10 हजार 138 महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 


जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून 16 हजार 902 , स्वारगेट 15 हजार 558 , भोर 27 हजार 192 , नारायणगाव 52 हजार 88, राजगुरुनगर 41 हजार 531, तळेगाव 14 हजार 105, शिरुर 19 हजार 522, बारामती 40 हजार 952 , इंदापूर 32 हजार 309, सासवड 15 हजार 817, दौंड 10 हजार  265 , पिंपरी-चिंचवड 8 हजार 996, एमआयडीसी 14 हजार 910 असे एकूण जिल्ह्यात 3 लाख 10 हजार 138 महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला 89 लाख 14 हजार 138 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 


एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येत आहे, अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.


सुरुवातीच्या 4 दिवसात राज्यात 48 लाख महिलांनी केला प्रवास


चार दिवसात राज्यात सुमारे 48 लाख महिला प्रवाशांनी प्रवास केलाय. जो एकूण प्रवासी संख्येच्या 30 टक्के आहे. एकट्या परभणीत 65 हजार तर धाराशिवमध्ये 57 हजार महिलांनी चार दिवसात या योजनेचा लाभ घेतला आहे.  राज्यभरातील अनेक बस स्थानकावर आणि बसमध्येही महिला प्रवाशांची गर्दी  मोठ्या प्रमाणात वाढली. ताई, माई, अक्का, काकू, मावशी आणि आजी सगळ्या प्रवासाला निघाल्या.