Pune Crime News : मागील अनेक वर्षांपासून पुण्यात (Pune Crime News) फिरणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील खडक परिसरातून पोलिसांनी या पाकिस्तानी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद अमान अन्सारी असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. 2015 पासून हा तरुण भवानी पेठेतील चुडामन तालीमजवळ राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार अन्सारी हा 2015 पासून पुण्यातील भवानी पेठेत बेकायदेशीर पणे राहत होता. अवैधरित्या गेल्या आठ वर्षांपासून तो इथे वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक बनावट पाकिस्तानी पासपोर्ट आढळून आला असून त्याने या पासपोर्टचा वापर करुन दुबईला देखील प्रवास केला होता. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका हा इतकी वर्ष पुण्यात काय करत होता याचा तपास आता सुरु आहे.
पुण्यात फिरत असताना पोलिसांनी हेरला...
हा तरुण 2015 पासून पुण्यात राहतो. वेगवेगळी कामं करतो. कागदपत्र नसतानादेखील हा तरुण पुण्यातील भवानी पेठेत राहत होता. पोलिसांना या तरुणासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस मागील काही दिवसांपासून या तरुणाच्या मार्गावर होते. त्यात पोलिसांना तो खडक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सापळा रचून त्याला गजाआड केलं आहे.
भारतात कशाला आला?
2015 पासून हा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राहिला. त्यात पुण्यात त्याचं वास्तव्य होतं. मात्र तो पुण्यात कशाला आला होता, याची माहिती पोलीस घेत आहेत.