Ajit Pawar : पुण्यातील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दांडी मारली आहे. बैठकीची वेळ पुढे ढकलल्याने अजित पवार यांनी या कालवा समितीच्या बैठकीला न येण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील शासकीय विश्रामगृहात बैठक होती. पुण्याच्या पाणी कपातीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार होती.
शहर आणि जिल्ह्यातील उन्हाळी आवर्तन,जिल्हा आणि शहराचा पाणीपुरवठा याविषयी आजच कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीची वेळ सकाळी 11 वाजताची वेळ होती. मात्र रात्री अचानक या कालवा समितीच्या बैठकीची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे अजित पवार दुसऱ्या कार्यक्रमासाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे शहराला आणि ग्रामीण भागाता जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जिल्ह्यातील चार धरणांमध्ये शिल्लक आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे. याच विषयावर संविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे. त्यानंतर संपूर्ण पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुण्यात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याच महत्वाच्या बैठकीला अजित पवारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अजित पवारांच्या अनुपस्थितीत बैठकीला सुरुवात
पुणेकरांच्या आणि ग्रामीण भागातील अनेकांचा महत्वाचा असणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजित पवारांनी जरी या बैठकीला दांडी मारली असली तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात या बैठकीला सुरुवात झाली आहे. आमदार अशोक पवार, संजय जगताप, दत्तामामा भरणे, भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत सध्या बैठक सुरु आहे.
अजित पवार मुंबईकडे रवाना
अजित पवार यांचे रोजचे दौरे ठरलेले असतात आणि ते त्यांच्या वक्तशीरपणासाठी कायम चर्चेत असतात. त्यांचे दौरे पहाटेपासून सुरु होतात. पाहणी असो किंवा बाकी जनता दरबार असो वेळेवरच सुरु होतात. या बैठकीची वेळ अचानक बदलल्याने अजित पवारांच्या पुढील नियोजित दौऱ्याला उशीर झाला. त्यामुळे त्यांनी या बैठकीला दांडी मारली आहे. त्याचे पुढील कार्यक्रम मुंबईत नियोजित आहे. त्यामुळे ते पुढील कार्यक्रमासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
हेही वाचा
Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात होणार? जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक