Ajit Pawar : वडिलांचं निधन झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी बस्तान बसवण्यासाठी काय काय केलं? त्याकाळात त्यांची परिस्थिती कशी होती? त्यांनी केलेल्या मेहनतीचे अनेक किस्से त्यांनी आज (18 मार्च) जनतेसोबत शेअर केले आहेत. बारामतीतील (Baramati) आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी विचारांना वाट मोकळी करुन दिली.
ते म्हणाले की, "मी देखील दुधाच्या व्यावसायातून पुढे आलो आहे. माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर याच व्यावसायामुळे माझं बस्तान बसलं होतं. माझ्या आयुष्यात असे अनेक किस्से आहेत. जे लोकांना खरे वाटणार नाहीत मात्र एक किस्सा सांगतो. त्या काळात एक गाय साडे सात हजारांना विकत होतो आणि एक एकर जमीन साडेसात हजाराला घेत होतो. त्याकाळात जमीनीचे दर कमी होते आणि बाकी गोष्टींसंदर्भात एक वेगळं कुतूहल पाहायला मिळायचं.
गायींसाठी पंखे...
बारामतीत आधीपासूनच शेती आणि दुग्ध व्यावसाय मोठ्या प्रमाणात होता. त्याकाळी शेतकरी पशुधनाची नियमित काळजी घेत होते. अजित पवार म्हणाले की, "बारामतीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गायींसाठी पंखे वगैरे लावत असत. यातून त्यावेळी एक कळलं होतं की शेतीत कष्ट घेतलं तर यश मिळतेच. आताच्या गायींना योग्य पोषण मिळत असल्यामुळे त्यांचं शेणही भरपूर प्रमाणात मिळतं. गायी आणि म्हशीदेखील चांगल्या सुदृढ आहेत. गायीच्या आहारवर या शेतकऱ्यांचा अभ्यास झाला आहे. दर 12 तासांनी गायीचं आणि म्हशीचं दूध काढलं जातं. त्यामुळे आरोग्यही नीट राहतं."
Ajit Pawar : वडील वारल्यानंतर माझं डेअरीमुळे बस्तान बसलं
कामात राजकारण नाही..
सत्ता गेल्यानंतर विकासाचा वेग मंदावेल, असे वाटत होते. राजकीय मतांतरे असू शकतात. पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारणात आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना आपली कामे अडत नसल्याचं ते म्हणाले.
आज आईचा वाढदिवस...
आजचा वेळ मी कुटुंबासाठी वेळ दिला आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज आईच्या सहवासात दिवस घालवायचा असं ठरवलं होतं आणि उद्या माझा भाऊ 61 वर्षात पदार्पण करतो आहे. त्याचे केस पांढरे आणि माझे केस काळे आहेत हा रंगाचा परिणाम आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी बंधू रणजीत पवार य़ांच्यावर केली आहे. वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे प्रत्येकाने वेळेची आणि काळाची किंमत केली पाहिजे. सोबतच वेळेत कामंही केली पाहिजे, असाही सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
Ajit Pawar Baramati : रणजीतची पांढरी दाढी, माझे काळे केसं, हा सगळा रंगांचा खेळ : अजित पवार