Pune crime news : क्रिकेट खेळण्याचा वादातून मावस भावाने केला(Pune Crime news) तीन लहान बहिणींवर लोखंडी रॉड, पाईपने हल्ला केल्याची धक्कादायक पुण्यातून समोर आली आहे. भावाने केलेल्या हल्ल्यात तीन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. पुण्यातील वारजे भागातून धक्कादायक घटना समोर  आली आहे. कृष्णा सहानी यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 


ही संपूर्ण घटना शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास वारजेतील दांगट वस्ती जवळ घडली. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही मावस भावंड आहेत. या दोघांमध्ये मैदानावर क्रिकेटच्या खेळावरून काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला.


यावेळी आरोपींना कृष्णा दिसला नाही त्यामुळे त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसेच तीन लहान बहिणी यांच्यावर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दर दोन दिवसाला हल्ले...


पुण्यात किरकोळ वादावरुन हल्ल्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील भाईगिरी कधी संपणार?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वी किरकोळ वादातून एका टोळीने थेट एका व्यक्तीच्या हाताच्या पंजावर हल्ला केला. यात या व्यक्तीचा थेट हातच तुटला त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हात जोडला होता. या घटनेमुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दर दोन दिवसाला अशा हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. 


पुण्यात गुन्हेगारीत वाढ


पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहे. पुण्यात सध्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचं बघायला मिळत आहे. त्यात शहरात चुहा गॅंग आणि कोयता गॅंग चांगल्याच सक्रिय आहेत. कोयता गॅंगने तर शहरात धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातील अनेक परिसरात या गॅंगने दहशत निर्माण केली आहे. या आणि यासारख्या अनेक गॅंगला आळा घालण्याचं पुणे पोलीसासमोर मोठं आव्हान आहे.