Honey Bee : मधमाशी (Honey Bee) म्हटलं की मधाचं पोळं आठवतं, मध आठवतो, मात्र त्यानंतर मधमाशांनी लावलेला डंकही आठवतो. मग मधमाशीच्या नादाला लागणेच चुकीचं असल्याचे समजून आपण अनेकदा मधमाशीला डिवचत नाही. मात्र तरीही मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. जुन्नरजवळील मानमोडी पर्वतातील भुतलेणी पाहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील अकरा पर्यटकांवर शनिवारी दुपारी मधमाश्यांनी हल्ला केला. मुलुंड, डोंबिवली, नेरळ येथून आलेले पर्यटक मोबाईलच्या फ्लॅश लाईटने लेणी पाहत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांनी आपले सामान आणि मोबाईल सोडून पळ काढला. या घटनेत पाच पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.


जखमी पर्यटकांना जुन्नर येथील प्रशांत कबाडी यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले. वनरक्षक रमेश खरमाळे, तेजस शिंदे, ऋषिकेश गाडवे, भरत चिलप, दीपक सांगडे यांनी पर्यटकांचे सामान गुहेतून बाहेर काढण्यात आणि जखमींवर प्राथमिक उपचार करण्यासाठी सहकार्य केले. अकरा जखमी पर्यटकांपैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पावती कांबळे, प्रियदर्शन कांबळे, आरती वाघमारे, सुवर्णा कांबळे आणि पंडित थोरात अशी जखमी पर्यटकांची नावे आहेत.


या घटनेने पर्यटकांनी आपल्या सभोवतालच्या परिसराची जाणीव ठेवण्याची आणि नैसर्गिक क्षेत्रांना भेट देताना खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित केली आहे. वन अधिकार्‍यांनी मोठ्याने आवाज करणे तसेच फ्लॅशलाइट न वापरण्याचा सल्ला दिला आहे. कारण यामुळे नैसर्गिक अधिवासाला त्रास होऊ शकतो आणि वन्य प्राणी किंवा कीटकांना त्रास होऊ शकतो.


सयाजी शिंदेवर मधमाशी हल्ला...


अभिनेते सयाजी शिंदे  यांच्यावर मधमाशांचा हल्ला  झाला होता. सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरु (महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला होता. पुणे बंगळुरु  महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं होतं. सयाजी शिंदे कायम जंगलांमध्ये किंवा दाटीवाटीच्या परिसरात झाडांचं संगोपन किंवा अभ्यास करण्यासाठी फिरत असतात. एवढ्या वर्षात त्यांच्यावर पहिल्यांदाच मधमाश्यांचा हल्ला झाला आहे. या सगळ्या घटनेबाबात बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर मधमाश्यांचा हल्ला झाला मात्र मी सुखरुप आहे. मला कोणतीही दुखापत झाली नाही.