PCMC Old Pension Scheme : जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात आता महापालिका आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.


पिंपरी महापालिकेच्या संपावर असणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आलेत. संबंधित विभाग प्रमुखांकडून तशा नोटिसा धाडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं हे अधिकारी-कर्मचारी आजचं रुजू न झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.


महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी संपामध्ये सहभागी होऊ नये याबाबत सूचना करुनही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे महानगरपालिके समोरील प्रशासकीय आव्हाने विचारात घेवून पुर्वनियोजीत उद्दीष्ट्ये पुर्ण करणे, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु ठेवणे, समाज उपयोगी विकास कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करणे, यामध्ये बाधा निर्माण होवून शहरातील नागरिकांना वेठीस धरले गेले आहे.


पहिल्या टप्प्यामध्ये जे अधिकारी व कर्मचारी दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पुर्वी महानगरपालिका सेवेत रुजू झालेले (जुनी पेन्शन योजना लागू असेलेले) आहेत. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू व्हावे. संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेवर कार्यरत जुन्या पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ कर्तव्यावर रुजू होण्याबाबत निर्देश दिले आहे. या संदर्भात प्रत्येक विभागाच्या प्रमुखाला सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचं पालन न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचंही पत्रकात सांगितलं आहे.


आरोग्य विभागावर संपाचा जास्त परिणाम


या सगळ्या संपाचा सर्वात जास्त परिणाम आरोग्य विभागावर पडला आहे. अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावात रुग्णालय आहे. गावात पर्यायी रुग्णालय नसल्याने अनेक लोक या रुग्णालयावर अवलंबून असतात. मात्र या रुग्णालयातील कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण पुण्यात दाखल होत आहेत. पुण्यातही उपचारासाठी डॉक्टर मिळत नसल्याने नागरिकांना रुग्णांना रस्त्यावर घेऊन उभं राहावं लागत आहे. त्यामुळे संप करा मात्र रुग्णांचा जीव जाईपर्यंत अंत पाहू नका, अशा भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहे.