Maharashtra Kesari women wrestling competition : महिला महाराष्ट्र्र केसरी कुस्ती (Maharashtra kesari) स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महिला खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्याची संधी या खेळाडूंना मिळणार आहे आणि त्यासाठीच या खेळाडूंनी अधिकचा घाम गाळायला सुरुवात केली आहे. मात्र  68 ते 76 किलो वजनाची अट ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या दृष्टीने धोक्याची ठरू शकते. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे मार्गदर्शकांनी ही चिंता व्यक्त केली आहे. 


महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा होताच महिला मल्लांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. महाराष्ट्र केसरीचा आखाडा गाजवण्यासाठी राज्यातील महिला मल्लांनी अधिकची कंबर कसायला सुरुवात केली आहे. स्वप्नातही विचार न केलेल्या आखाड्यात आता महिलांना दंगल करता येणार आहे आणि म्हणूनच या महिला मल्लांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. राज्यातील अनेक महिला मल्लांनी राष्ट्रीय पातळीवर पदकं पटकावली आहे. मात्र याच पदकांमध्ये आता महाराष्ट्र केसरीची भर पडणार आहे. सोबतच महाराष्ट्र केसरीच्या आखाड्याचा अनुभव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल, असा त्यांना विश्वास आहे. 


महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा मिळविण्यासाठी अनेक मल्ल वजन वाढवतात. आता महिला महाराष्ट्र केसरीचा 'किताब 68 ते 76 किलो वजनी गटासाठी आहे, म्हटल्यावर महिला मल्ल वजन वाढविण्यावर भर देणार हे उघड आहे. मात्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, असं आंतरराष्ट्रीय कुस्तीचे मार्गदर्शक दिनेश गुंड यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली की राज्यभर मोठा मान-सन्मान मिळतो. मात्र हा मान-सन्मान मिळवताना महिला मल्लांनी वजन वाढवून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेची स्वतःची दारं बंद करून घेऊ नयेत, असंही मार्गदर्शकांचं म्हणणं आहे. 


पुरुष गटातील मातब्बर मल्लांनी महाराष्ट्र केसरीचा आखाडा गाजवला आहे. मात्र अपवाद वगळता इतर मल्लांना राष्ट्रीय स्पर्धेची निवड प्रक्रिया ही पार पाडता आलेली नाही आहे. या मल्लांचं वाढलेलं वजन या सगळ्याला कारण आहे. महिलांसाठी महाराष्ट्र केसरीचा आखाडा उघडला आहे.  त्यांच्यात नवचैत्यन्य ही निर्माण झालं आहे. मात्र त्यांनी वजन वाढवू नये. अन्यथा त्यांचं ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. 


'या' गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यानुसार 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 असे वजनी गट असतील. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल खिताबासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.