पुणे : देशभरात होणाऱ्या वेगवगेळ्या परीक्षांचे पेपर फोडून त्यांची लाखो रुपयांना विक्री करणारी एक टोळी देशपातळीवर काम करत असल्याचं उघड झालंय. याच टोळीने 31ऑक्टोबरला झालेला आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागले आणि याच टोळीने रायगड जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीचा पेपर आणि यावर्षी देशभरात होणाऱ्या पण ऐनवेळी रद्द कराव्या लागलेल्या सैन्य भरतीचा पेपरही फोडल्याच आर्मी इंटेलिजन्सनी केलेल्या तपासात दिसून आलय. या टोळीत सहभागी असल्याच्या आरोपावरून फेब्रुवारी महिन्यात आर्मीच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र अजूनही ही टोळी कार्यरत असल्याचं आरोग्य विभागाच्या पेपर फुटीतून उघड झालंय .


 मात्र  पिंपरी - चिंचवड पोलीस कोणताही घोटाळा नसल्याचा दावा करत आहेत तर पुणे पोलीस याबाबत बोलण्यास तयार नाहीत . त्यामुळे पोलीस नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत असा  प्रश्न उपस्थित होत आहे . पोलीस कितीही नाही म्हणत असले तरी आर्मी इंटेलिजन्सने अटक केलेल्या आर्मीमध्ये हवालदार मम्हणून काम करणाऱ्या अनिल चव्हाणच्या ऑडियो क्लिपमधून या घोटाळ्याचा भांडाफोड झाला आहे . या ऑडियो क्लिपमध्ये आरोग्य भरती परीक्षेतील शंभरपैकी 92 प्रश्नांची उत्तरं आपण मिळवल्याच अनिल चव्हाणके म्हणत आहे. 


 31 ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याच उघड झाल्यावर 27 नोव्हेंबरला पुणे सायबर सेलला याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . मात्र सैन्य भरती घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्मी इंटेलिजन्सला आठ नोव्हेंबरलाच हा पेपर लीक करणाऱ्या टोळीचा छडा लागला होता. त्याचबरोबर या टोळीकडून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरतीचा पेपरही फोडण्यात येणार असल्याचं आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवारकडून साडे बारा लाख रुपये घेण्यात येणार असल्याचं आर्मी इंटेलिजन्सला समजलं.  आर्मी इंटेलिजन्सला ही माहिती आर्मीत हवालदार म्हणून काम करणाऱ्या अनिल चव्हाणके याच्या कॉल रेकॉर्डिंगमधून मिळाली होती. ही माहिती आर्मी इंटेलिजन्सने पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली.


 पिंपरी चिंचवड पोलीस आणि आर्मी इंटेलिन्जसने नऊ नोव्हेंबरला लगेच नाशिकहून अनिल चव्हाणके , सांगलीहून त्याचा साथीदार प्रवीण पाटील आणि पुण्यातून महेश वैद्यला अटक केली . मात्र आता पिंपरी - चिंचवड पोलीस त्यांच्या तपासात आरोग्य विभागात कोणताही घोटाळा झालाच नसल्याचा दावा करत आहेत . फक्त सैन्यात भरती करून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एजंटला आपण अटक केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. पण आर्मी इंटेलिजन्सच्या मते देशपातळीवर काम करणाऱ्या या टोळीतील सदस्य अनेक पेपर फुटीत सहभागी आहेत. 


या टोळीतील लोक राज्यातील आणि देशातील अनेक परीक्षांचे पेपर लीक करण्यात सहभागी आहेत.  यावर्षी 28 फेब्रुवारीला देशभरात आर्मी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती.  पण या परीक्षेचा पेपर आधीच लिक झाल्यामुळे मिल्ट्री इंटेलिजन्सने पुणे पोलीसांसोबत कारवाई करुन आदल्या दिवशीच हा पेपर बारामतीतील एका अॅकाडमीतून ताब्यात घेतला. त्यानंतर देशभरात कारवाईचे सत्र सुरु झाले आणि देशातील आर्मी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.  या प्रकरणात आंध्र प्रदेश,  तमिळनाडू , दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आर्मीचे आठ  अधिकारी आणि एका  एजंटला अटक करण्यात आली.