Dhirendra Maharaj Controversial Statement: पुणे :  बागेश्वरधामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Maharaj) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अंनिसच्या निशाण्यावर आलेल्या या महाराजांनी आता तर कहरच केला आहे.  अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुकोबांसंदर्भात बोलताना धीरेंद्र महाराजांची जीभ घसरली आणि नव्या वादाला तोंड फोडलं आहे. जगतगुरू संत तुकाराम (Tukaram Maharaj) महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केली आहे. तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबांनी केलं आहे.  


अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या  वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेचा कळस रचणाऱ्या  तुकोबांच्या बाबतीत  धीरेंद्र उर्फ बागेश्वर महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. धीरेंद्र महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धीरेंद्र महाराजांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. 


धीरेंद्र महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना देहू संस्थानचे माणिक महाराज मोरे म्हणाले,  तुकाराम महाराजांचे कर्तृत्व महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. तुकोबारायांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करू नयेत. तर, महाराजांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे धीरेंद्र महाराजांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी, आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. 



कोण आहेत धीरेंद्र महाराज?


धीरेंद्र रामकृपाल गर्ग  यांचा जन्म 1996 साली झाला. मध्यप्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म  झाला. वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग.  तीन भावंडांमध्ये धीरेंद्र सर्वात मोठे. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. आजोबा हनुमान मंदिराचे पुजारी होते. त्यांच्या तालमीतच धीरेंद्रही महाराज  बनले आणि त्याने आपले दरबार भरवायला सुरुवात केली. 


नागपूरमध्ये आलेल्या धीरेंद्र महाराजांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव (Shyam Manav) यांनी खुलं आव्हान दिलं. पण ते आव्हान न स्वीकारताच नागपूरमधून बाहेर पडून मध्यप्रदेशमध्ये जाऊन त्यांनी प्रतिआव्हान दिलं. पण इतकं होऊनही हा बाबा थांबले नाहीत.  आणि त्याने महाराष्ट्राच्या आराध्य असलेल्या तुकोबांवर दैवतावरच शेरेबाजी केली आहे.  संतांच्या रचनांनी  संतांच्या विचारांनी या महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. ती महाराष्ट्राची दैवते आहेत आणि म्हणूनच या महाराजांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ram Kadam : श्याम मानव विरुद्ध धीरेंद्र महाराज यांच्या वादात भाजपची उडी