Maharashtra New CM : मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असतानाच मावळातील तरुणांनी एक अनोखं साहस केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra New CM) व्हावे, यासाठी तरुणांनी 800 फूट उंच कड्यावरुन बॅनर झळकावला आहे. सोबतच मावळचे (Maval) आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं, अशा आशयाचा 30 फुटाचा मोठा बॅनर नागफणी कड्यावर झळकावण्यात आला आहे.


'अजित पवारांसह सुनिल शेळके यांना मंत्रिपद मिळावं'


अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं, अशा आशयाचा 30 फुटाचा मोठा बॅनर 800 फुट उंचीच्या नागफणी कड्यावर झळकावण्यात आला आहे. या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.


समर्थकांची जोरदार बॅनरबाजी


राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा राज्यभर रंगली आहे.  अशातच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


नागफणी कडा चढाईला अत्यंत धोकादायक


नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या  घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला अतिशय दुर्गम आणि कठीण आहे, याला ड्युक्स नोज (Dukes Nose) असंही म्हणतात. गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते.


'दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचं स्थान मिळावं'


हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचं स्थान मिळावं, हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे. या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.


800 फूट उंचीवर झळकावला बॅनर


आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गिर्यारोहकांना खुणावणारे अनेक सुळके आपण पाहतो. या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरित्या चढाई करतात. अशाच सुमारे 800 फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामना करत 30 फुटीचा मोठा बॅनर झळकावला आहे.


हेही वाचा:


Samruddhi Mahamarg : फक्त एक महिना उरला, समृद्धी महामार्गाचं काम संपल्यात जमा; आता नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत