मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर प्रवासृ अवघ्या 8 तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) शेवटच्या टप्प्याचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचं काम अखेर पूर्ण झालं असून आता फक्त फिनिशिंग बाकी आहे. या अनुषंगाने नव्या वर्षात, म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं (MSRDC) नियोजन आहे.
नव्या वर्षात नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर-मुंबई प्रवास केवळ 8 तासांत पार करता येणार आहे. नागपूर-मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग एकूण 701 किमी लांबीचा आहे. त्यापैकी 652 किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत दोन टप्प्यात सुरू झाला आहे. यामुळे इगतपुरी-नागपूर-इगतपुरी हा भाग सहा ते सात तासांत जोडला गेला आहे. आता उर्वरित आणि अखेरचा टप्पा सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच हा मार्ग देखील जानेवारीत खुला होईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.
डिसेंबरपर्यंत फिनिशिंगची कामं उरकणार
नागपूर-मुंबई प्रवासाचं अंतर 16 तासांवरून केवळ 8 तासांवर आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे तर सुरू झाले, मात्र शेवटच्या टप्प्यास काही कारणामुळे विलंब झाला. यानंतर हा इगतपुरी-आमणे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. शेवटच्या टप्प्याचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. सध्या फिनिशिंगची कामं वेगात सुरू असून ही कामं डिसेंबर अखेरीस पूर्ण होतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षात म्हणजेच, जानेवारीत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
इगतपुरी ते भिवंडी अंतर केवळ 40 मिनिटांत
इगतपुरी-आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास इगतपुरी ते आमणे, म्हणजेच इगतपुरी ते भिवंडी अंतर केवळ 40 मिनिटांत पार करता येणार आहे. आजच्या घडीला हे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी
महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे गेल्या वर्षभरात तब्बल 15 हजारांहून अधिक वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली. यानंतर अपघात रोखण्यासाठी गुळगुळीत टायर असलेल्या 500 पेक्षा अधिक वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे वाहनांची आणि टायरची स्थिती चांगली नसल्यास समृद्धी महामार्गावर जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा:
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी, एन्ट्री पॉइंट्सवर तपासणी