Maharashtra Legislative Council Election : भाजपने पिंपरी चिंचवडमधी अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड भाजपमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आनंदोत्सवाची एकही संधी न सोडणाऱ्या निष्ठवंतांनी गोरखे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर साधा जल्लोषही केलेला नाही. उलट उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी नाराजीच्या सुरात एक पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पाठवण्यात आलं. त्याच पत्रावर सर्वांनी सह्या सुद्धा केल्याचं बोललं जात आहे. तथापि, प्रत्यक्षात हे पत्र फडणवीसांना देण्यात आलंच नाही, अशीही चर्चा आहे. मात्र या चर्चेत काही तथ्य नसल्याचं आणि गोरखेंच्या विजयानंतर मोठा जल्लोष करणार असल्याचा दावा हे निष्ठावंत करत आहेत.


वाचा : Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषदेला आमदारांची शाही बडदास्त, भाजप सर्वात मजबूत; महायुती 9 जागा जिंकू शकते, पण क्रॉस व्होटिंग झाल्यास..


दुसरीकडे, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस चांगलीच वाढली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना 12वे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. 


कोण आहेत अमित गोरखे? 


गोरखे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहेत. गेल्या 40 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व, एम.ए (सामाजिक शास्त्र), एमबीए (एचआर) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे. पिंपरी-चिंचवड क्षेत्रात नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम आहे. अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनची नाळ असून शिक्षित आहेत. 


अत्यंत गरिबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजपकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी सध्याची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या गैरव्यवहारानंतर चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महामंडळ स्थिरस्थावर करण्याचे काम त्यांनी केले पण कालावधी फक्त चार महिन्यांचा मिळाला.


इतर महत्वाच्या बातम्या