पुणे: महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अतिशय चुरशीचा ड्रॉ निघाला आहे. गेल्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवराज राक्षे हे दिग्गज पैलवान, मॅटमध्ये ड्रॉच्या एकाच हाफमध्ये आले आहेत.
त्यामुळे पहिल्याच फेरीत अभिजीत कटके आणि शिवराज राक्षे आमनेसामने येतील. तर चंद्रहार पाटील आणि गणेश जगताप यांच्यात लढत होईल.
उभय लढतींमधला विजयी पैलवान दुसऱ्या फेरीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकतील.
दुसरीकडे मॅटवर सागर बिराजदार आणि विक्रांत जाधव पहिल्याच फेरीत आमने-सामने आले आहेत. तर मॅटवर अक्षय शिंदे आणि सचिन येलभर पहिल्या फेरीत एकमेकांविरोधात लढतील.
या दोन कुस्तीतले विजयी पैलवान दुसऱ्या फेरीत आमनेसामने येतील.
कोण होणार महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्र केसरी किताबासाठी यंदा एक ना अनेक नावांची चर्चा आहे. त्या चर्चेतलं पहिलं नाव आहे अर्थातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. त्यानंतर कामगिरीतला चढउतार आणि बळावलेली दुखापत यामुळं चंद्रहारला महाराष्ट्र केसरी जिंकता आला नाही.
सांगली जिल्ह्यातल्या भाळवणी गावचा हा पठ्ठ्या यंदा नव्या जोमाने महाराष्ट्र केसरी उतरला आहे. चंद्रहारने वयाची पस्तिशी ओलांडली असली तरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याची त्याची जिद्द कायम आहे.
पुण्याचा अभिजीत कटके हाही यंदा महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीत आहे. जेमतेम विशीतल्या अभिजीतला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीतही उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पण महान भारत केसरी किताबाने त्याचं मनोबल खचू दिलेलं नाही. गेल्या वर्षभरातला सारा अनुभव अभिजीतला यंदाही महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीत राखेल.
चंद्रहार पाटील आणि अभिजीत कटके यांच्याबरोबरच लातूरचा सागर बिराजदार, कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा माऊली जमदाडे, सातारच्या मोही गावचा किरण भगत, पुणे शहरचाच साईनाथ रानवडे, बुलडाण्याचा बाला रफिक शेख, मुंबई उपनगरचा विक्रांत जाधव ही नावंही महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत आहेत. या आठ पैलवानांपैकीच कुणीतरी एक की, कुणीतरी नवा पठ्ठ्या महाराष्ट्र केसरी जिंकतो याची कल्पना रविवारी भूगावच्या मैदानात येईल.
पैलवानांच्या भूगावात कुस्तीचं मैदान
पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातलं भूगाव हे पैलवानांचंच गाव म्हणून ओळखलं जातं. पैलवानकीची परंपरा असलेल्या या गावाला यंदा महाराष्ट्र केसरीच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणं जितकं मानाचं असतं, तितकंच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मिळणं मानाचं असतं.
त्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांचं जन्मगावही मुळशी तालुक्यात आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचं आयोजन कुस्तीच्या घरात होत असल्याची जाणकारांची भावना आहे. साहजिकच कुस्तीच्या घरात महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावतो, याबाबतची उत्सुकता त्यामुळे आणखी ताणली गेली आहे.
संबंंधित बातम्या
कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्र केसरी मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन
पहिल्याच फेरीत फायनलचा थरार, महाराष्ट्र केसरीचा चुरशीचा ड्रॉ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2017 05:19 PM (IST)
उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवराज राक्षे हे दिग्गज पैलवान, मॅटमध्ये ड्रॉच्या एकाच हाफमध्ये आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -