Maharashtra Kesari Pune: महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra kesari) पुण्यात (Pune) होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा  थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे. 900 कुस्तीगीर यांच्या सहभागात डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.


33 जिल्ह्यातील 11 महापालिकांमध्ये 45 तालीम संघातील 900 मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत. नामांकित 40 मल्ल सुद्धा घेणार या स्पर्धेत भाग घेणार आहेत.स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान करणार असून डिसेंबर महिन्यात 6 दिवस ही स्पर्धा होणार आहे. यंदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मान पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे अध्यक्ष  संजय सिंग  यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचे पत्र मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारले आहे. स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दुरदर्शी विचारातून 'महाराष्ट्र केसरी' ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. आम्हा मोहोळ कुटुंबीयांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे, अशी भावना मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.


पृथ्वीराज पाटील ठरला होता 2021 चा महाराष्ट्र केसरी


मागच्या वर्षी ही स्पर्धा साताऱ्यात पार पडली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनी ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या जल्लोषात ही स्पर्धा पार पडली होती. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता.आंतरराष्ट्रीय दर्जावर कुस्ती खेळलेला पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला. ज्यावेळी तो महाराष्ट्र केसरी झाला होता. त्यावेळी पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु घेत होता. अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक होते. दरम्यान पृथ्वीराजने 2021 महाराष्ट्र केसरी किताब  जिंकल्याने 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला होता. त्यामुळे यंदा पुण्यात कोण सहभाही होणार आणि हा मान कोणत्या शहराला मिळणार यांची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा 1961 मध्ये सुरु झाली होती. त्यावेळी बक्षिस म्हणून विजेत्यांना रोख रक्कम देण्यात येत होती. मात्र 1982 पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा बक्षिसच्या रुपात दिली जाते. या स्पर्धेत पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती.