Indapur Crime News : इंदापूर येथील कीर्तनकारास आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी एका पोलीस (Police) कॉन्स्टेबलसह त्याच्या अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय मोरे असं आत्महत्या केलेल्या या कीर्तनकाराचे नाव आहे. संजय मोरे यांनी 10 सप्टेंबरला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संजय मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव जाधव आणि त्याच्या एका अनोळखी मित्राची तक्रार संजय मोरे यांच्या बहिणीने दिली होती. यावरुन इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कीर्तनकार संजय मोरे यांनी आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 8 तारखेला आरोपी महादेव जाधव आणि त्याच्या एका साथीदाराने संजय मोरे यांच्या घरी जाऊन एका महाराजांच्या मुलीला फोन का करतोस?, असे म्हणत संजय मोरे यांस मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात संजय मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


आरोपींनी धमकी, शिवीगाळ करुन संजय मोरेंना मानसिक त्रास दिला : बहिणीचा आरोप


ऑगस्ट महिन्यात देखील आरोपींनी संजय मोरे यांना इंदापूर शहरालगत असलेल्या देशपांडे व्हेजजवळ असलेल्या तापी बिल्डिंग या ठिकाणी नेऊन तू महाराजांच्या मुलीला फोन का करतो या कारणावरुन यांना मारहाण केली. यावेळी आरोपी महादेव जाधव आणि त्याच्या साथीदाराने कीर्तनकार संजय मोरे यांचे डोके जिन्यावरती धरुन आपटून तसेच खाली पडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी हे संजय मोरे यांना वारंवार धमकी देणे, शिवीगाळ करुन मारहाण करणे, सतत फोन करणे अशाप्रकारे त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजय मोरे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं संजय मोरे यांची बहीण अश्विनी मोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.


पोलीस अधीक्षकांकडे आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचा अहवाल पाठवला


त्यावरुन पोलीस संजय जाधव आणि त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 306, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपी पोलीस कॉन्स्टेबल महादेव जाधव याचा अहवाल पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे पाठवला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.