पिंपरी चिंचवड : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असल्याचं अनेकदा समोर आलंय. लक्षणं दिसूनही ती अंगावर काढल्याने अशी परिस्थिती उद्भवत आहे. ही बाब अनेकांच्या जीवावर देखील बेतलेली आहे. आता तुम्हाला अशी वेळ येऊन द्यायची नसेल तर वेळीच एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे गरजेचे आहे. तेव्हाच पुढचा धोका टळू शकतोय.
64 वर्षांचे कोरोना बाधित भाऊसाहेब डमरे आज ठणठणीत आहेत. पण अवघ्या आठवड्यापूर्वी त्यांची तब्येत खालावलेली होती. चालणं ही शक्य नव्हतं. केवळ आणि केवळ एचआरसिटी मुळं हे शक्य झाल्याचं नातेवाईक सांगतायेत. कारण कोरोनाची लक्षणं जाणवत असताना आधी अँटीजेन आणि मग आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. पण त्रास कमी होतच नव्हता, शेवटी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी एचआरसिटीचा सल्ला दिला. 25 पैकी 16 स्कोर आल्याने ते पॉझिटिव्ह असल्याचं आणि परिस्थिती गंभीर असल्याचं निष्पन्न झालं. पण एचआरसिटीच्या या निर्णयामुळे तातडीचे उपचार मिळाले आणि आज आजोबा ठणठणीत बरे होऊ लागलेत.
कोरोनाची लक्षणं जाणवत असताना अनेकजण भितीपोटी चाचणी करणं टाळतात. त्यातून ही चाचणी केली आणि लागण झाल्याचं समजलं तर अनेकांकडून घरीच उपचार घेण्याचं ठरवलं जातं. हीच बाब 45 वर्षांवरील रुग्णांच्या जीवावर बेतणारी ठरते. आता हा धोका उद्भवू द्यायचा नसेल तर एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे अधिक गरजेचं आहे.
एचआरसिटी म्हणजे काय?
एचआरसिटी म्हणजे हाय रिझोल्युशन कॉम्पुटेड टोमोग्राफीचा (High-resolution computed tomography) रिपोर्ट हा रुग्णाच्या छातीत निमोनिया किती पसरला आहे, हे दर्शवतो. वैद्यकीय भाषेत त्याला स्कोर असं म्हणतात.
- 1 ते 8 दरम्यान स्कोर असेल तर घरीच उपचार घेतले तरी चालतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन महत्वाचे असते.
- 9 ते 10 दरम्यान स्कोर असेल तर डॉक्टरांच्या निगराणी खाली असावे.
- 11 ते 16 दरम्यान स्कोर असल्यास ऑक्सिजन अथवा आयसीयू बेडवर उपचार घ्यावे.
- 17 ते 25 दरम्यान स्कोर असणं हे रुग्णांसाठी धोक्याचं असतं, यासाठी व्हेंटिलेटर बेडची गरज भासते. अशी माहिती वायसीएम रुग्णालयतील डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे.