Maharashtra assembly Budget session 2025 : राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. अर्थमंत्री अजित पवार अकराव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या कामांची माहिती दिली आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागात मेट्रोचे जाळे पसरलेले आहे. मात्र, पुण्याच्या आजुबाजूला देखील मेट्रोचे जाळे पसरणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.


अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे, पुणे मेट्रो टप्पा दोन अंतर्गत खडकवासला, स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप-  वारजे -माणिकबाग या दोन मार्गीकांच्या 9897 कोटी रुपयांच्या प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यते करता पाठवलेला आहे. 


- मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत.
- ⁠या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत
- ⁠येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत
- ⁠येत्या 5 वर्षांत एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.      
- ⁠नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे
- ⁠ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे
- ⁠पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-2 अंतर्गत खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग  या दोन मार्गिकांचा 9 हजार 897 कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे
- ⁠मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच  हाती घेण्यात येणार आहे.


महाराष्ट्र आता थांबणार नाही


अजित पवार म्हणाले, सन 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. विकसित भारत तयार करण्यासाठी आम्ही राज्यातील शाश्वत कामे हाती घेतली आहे. आम्ही कृषी आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.


अर्थसंकल्पात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा?


- नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे.
- रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता “स्टील हब” म्हणून उदयास येत आहे
- ⁠दावोस येथे  झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता 21 हजार 830 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले.
- ⁠त्यातून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.
- ⁠गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित केले जात असून त्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किंमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
- पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे.
- पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर निर्मितीच्या 4 हजार 259 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाला खाजगी क्षेत्राच्या सहभागाने मंजूरी देण्यात आली आहे.
- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.
- मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज जेट्टीचे 229 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे काम सुरु आहे. दिघी- जिल्हा रायगड, वेंगुर्ला- जिल्हा सिंधुदुर्ग तसेच काल्हेर डोंबिवली, कोलशेत, मिरा-भाईंदर- जिल्हा ठाणे येथील जेट्टींची कामे प्रगतीपथावर आहेत. काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु करण्यात येत आहे.
- राज्याचे “लॉजिस्टिक धोरण-2024” जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे 10 हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत
- ⁠प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे सुमारे 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे