पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन टायगर राबवल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता पुण्यात काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. पुण्याचे काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. धंगेकरांनी काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे, उदय सामंत यांची भेट घेतली होती, त्या भेटीनंतरच धंगेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता पुण्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याच्या चर्चा आहेत. याबाबत आज माध्यमांनी मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याचं उत्तर दिलं आहे.


काय म्हणालेत उदय सामंत?


रवींद्र धंगेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना सामंत म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली होती. पण ती भेट वेगळ्या कामांसाठी घेतली होती. मला तुमच्या माध्यमातून समजतंय की, रवींद्र धंगेकर आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. मराठवाड्यात जी ठाकरे गटाकडून निवडणूक लढली, शरद पवार गटाकडून लढली, ज्यांनी दीड लाख मतं घेतली ते नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असा दावा देखील यावेळी सामंत यांनी केला आहे. 


उदय सामंतांनी दिलेली ऑफर


मंत्री उदय सामंत शनिवारी (22 फेब्रुवारी) म्हणाले होते की, 'मला असं वाटतं की, रवींद्र धंगेकरांनी गळ्यात जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्यावर जर भविष्यात धनुष्यबाण आला तर आम्हाला सर्वांना आनंद होईल'. 


धंगेकर आणि शिंदेंच्या भेटीमुळे आधीपासूनच चर्चा


काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. रवींद्र धंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात धंगेकर पक्ष सोडणार का चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेट घेतल्याचं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. “माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरुप सांगितलं, तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली”, असं रवींद्र धंगेकर तेव्हा म्हणाले होते. त्यानंतर उदय सामंत आणि धंगेकरांची भेट झाली होती, त्यानंतर धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला सामंत उपस्थित होते, या गाठीभेटींमुळे चर्चांना उधाण आलं होतं, मात्र आज अखेर धंगेकरांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.


मुलाच्या बर्थ डेला उदय सामंतांची 'एन्ट्री'


मंत्री उदय सामंत हे पुण्यामध्ये असताना रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली असल्याचा समोर आलं होतं. या दोन्ही नेत्यांच्या भेटी दरम्यानच रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा वाढदिवस देखील साजरा केल्याचे समोर आलं होतं. उदय सामंत यांनी भेटीचे आमि वाढदिवसाचे फोटो त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले होते.


काय म्हणाले धंगेकर?


ज्या पक्षासोबत मी गेली १०-१२ वर्षे काम करत आहे. त्यामुळे पक्षातील अनेकांसोबत कौटुंबिक नातं तयार झाले आहे. सर्वांनीच माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना माझ्यापाठी ताकद उभी केली. मी निवडणूक हरलो हा नंतरचा विषय,पण सगळ्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे कष्ट केले. एखादा पक्ष सोडताना दु:ख होतं याचं कारणच नाही, शेवटी आपण माणूस आहे. कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून ऐकत नव्हते. मी मतदारांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं, आता आमची कामं कोण करणार, लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे मी मध्यंतरी एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो होतो. मी उदय सामंत यांच्याशीही मी संपर्कात होतो. त्यांनी वारंवार म्हटलं की, आमच्यासोबत काम करा. याची बरीच चर्चा झाली. मी ज्या भागात वर्षानुवर्षे काम करत आहे, तेथील लोकांशी बोललो. मग लक्षात आलं की, तुम्हाला काम तर करावचं लागेल. पण सत्तेशिवाय काम होत नाही. एकनाथ शिंदे यांनी मी काँग्रेसचा आमदार असतानाही मला मदत केली होती. असं लक्षात आलं की, ज्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये पोहोचला आहे, त्यांच्यासोबत काम करायला हरकत नाही, अशी मानसिकता झाली. मी आज माझा निर्णय घेतला, आपण शिंदे साहेबांसोबत काम करावं. आमची संध्याकाळी सात वाजता भेट होईल. त्यानंतर आमचा निर्णय  होईल, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले