112 new helpline- पुणे शहरातील गुन्ह्यांची आणि अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे पोलीसांकडून एकमेव आपत्कालीन हेल्पलाईन जाहीर करण्यात आली आहे.112 ही नवी हेल्पलाईन असणार आहे. फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडे ही हेल्पनाईन येत्या काळात वापरली जाणार आहे, अशी माहीती पुणे पोलीसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


'112' या एकाच हेल्पलाईनवरून आता पुणेकरांना सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमनदल आणि महिला हेल्पलाईनची एकत्रित मदत उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जीपीएसच्या यंत्रणेच्या साह्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोणत्या स्थळावरुन आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे.


आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांचं गांभीर्य लक्षात घेतला. पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमनदल, रुग्णवाहिका, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन या सगळ्यांना आता एकाच नंबरवर सगळ्याप्रकारची मदत मिळणार आहे. घडलेल्या घटनेच्या आवश्यकतेनुसार यंत्रणा घटनास्थळी दाखल होईल.






काय आहे पुणे पोलीसांचं ट्विट- 


"लक्षात ठेवा की लवकरच, एकच आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक '112' असेल!


इतर सर्व क्रमांक 100, 101 (फायर ब्रिगेड), 1091 (महिला हेल्पलाइन) यामध्ये एकत्रित केले जातील. "


कशी असेल ही सेवा-
112  हा आपत्कालीन नंबर अमेरिकेच्या 911 या हेल्पलाईन नंबरसारखा आहे. इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम (ERSS)यांच्या अंतर्गत ही हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. यापुर्वी आपल्या पोलीसांच्या मदतीसाठी 100 नंबर, महिला हेल्पलाईनसाठी 1091 आणि चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हे नंबर उपलब्ध होते. 112 या नंबरवरुन मदत मागितल्यास घटनास्थळाजवळ गस्त घालणाऱ्या जीपीएस यंत्रणेवर त्यांची माहिती जाईल. याद्वारे तक्रारदाराला कमीत कमी वेळात मदत केली जाईल. 


अनेक अडचणी होणार दूर-
100 नंबर असताना पोलीसांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कॉल नेमका कोणत्या तक्रारीसाठी आला?, याबाबत अनेकदा शंका असायची. कधी तक्रारदाराकडून चुकीची माहितीसुद्धा देण्यात येत होती. आता मात्र त्या अडचणींना नागरिकांना किंवा पोलीसांना सामोरे जावे लागणार नाही, त्यामुळे कमीत कमी वेळात मदत करणे शक्य होणार आहे.