पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्या (3 मे) पुण्यात होणारा महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. मनसे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एकत्र येऊन 3 मे रोजी पुण्यातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये भोंगे लावून आरती करण्यात येईल, असं शनिवारी (30 एप्रिल) जाहीर केलं होतं. त्यासाठी मनसेच्या सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता मनसेकडून महाआरतीचा कार्यक्रम स्थगित केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.


राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत सरकारला इशारा देत म्हटलं होतं की "आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही, मात्र 4 तारखेपासून ऐकणार नाही." "राज ठाकरेंच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील उद्याचा महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. मुस्लीम धर्मियांच्या सणामधे व्यत्यय नको म्हणून राज ठाकरेंनी हा कार्यक्रम स्थगित करण्याच्या सूचना केल्या आहे," अशी माहिती मनसेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी दिली. तसंच "विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या निर्णयाचा महाआरती स्थगित करण्याशी काहीही संबंध नाही," असंही खैरे यांनी स्पष्ट केलं.


मनसेने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील सर्व मंदिरांमध्ये भोंगे लावून महाआरती करण्यात येईल असं सांगितलं होतं. तशा सूचना देखील विभाग प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. या महाआरतीच्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल देखील सहभागी होणार होते. या पत्रकार परिषदेत दोन्ही संघनांचे पदाधिकारीही सहभागी होते.


Hanuman Chalisa Row : मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमात आमचे कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत : विहिंप


विहिंप संघटन म्हणून सहभागी होणार नाही : मनोहर ओक 
मनसेच्या महाआरतीच्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद संघटन म्हणून सहभागी होणार नाही. कार्यकर्ते हवे असल्यास आरतीला जाऊ शकतात. विश्व हिंदू परिषद सर्व हिंदूच्या संघटनाचे काम करते. मनसेने उपस्थित केलेला मुद्दा हिंदुत्वाचा आहे. मात्र कुठल्या एकाच पक्षातील हिदूंसांठी विश्व हिंदू परिषदेने काम केले तर इतर पक्षातील हिंदूंनी कोणाकडे पाहायचे, असं विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र मठ-मंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक यांनी म्हटलं आहे.  


मनसेच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची गोळा करण्याचं काम सुरु
दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्याचं काम पोलीस खात्याने सुरु केलं आहे. मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या राहण्याचा पत्ता, शाखेच्या कार्यालयाचा पत्ता आणि इतर माहिती पोलिसांकडून विचारली जात आहे. त्याचबरोबर मनसेच्या काही शाखांवर जाऊनही पोलीस चौकशी करत आहेत.