बारामती/नाशिक : कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला राजेंद्र पवार अनुपस्थित राहिले. 2019 चा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला होता. आज (2 मे) त्याच पुरस्काराचं वितरण नाशिकमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडत आहे. राज्यपालांच्या हस्ते आज हे पुरस्कार वितरीत होणार असल्यामुळे राजेंद्र पवार अनुपस्थित राहिले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आपण राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितलं.


मागील वर्षी बारामतीमधील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना 2019 रा राज्य सरकारचा पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. कृषीक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाला. पवार कुटुंब फक्त राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र राजेंद्र पवार यांनी जाणीवपूर्वक स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवत कृषी क्षेत्रात काम केलं. आपले वडील आप्पासाहेब यांच्याप्रमाणे ते शेतीत रमले. वडिलांच्या ग्रामविकास आणि शेतीविकासाच्या वारशाला ते समर्थपणे पुढे नेत आहेत. राजेंद्र पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत. 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण झालं नव्हतं. त्यामुळे 198 पुरस्कारांचे वितरण आज पार पडत आहे. आज 2017 ते 2019 या वर्षांचे पुरस्कार वितरण होत आहे. 2017 मधील 64 शेतकरी, 2018 मधील 64 आणि 2019 मधील 70 पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. 




राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित आहेत. मागील 15 दिवसात राज्यपाल दुसऱ्यांदा नाशिकला आले असून राज्य सरकारचे मंत्री आणि राज्यपाल एकाच व्यासपीठावर हजर आहेत.


निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी घोषणा करणारं आपलं सरकार बेशरम नाही : मुख्यमंत्री
या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "अन्नदाता सुखी असेल तर देशही सुखी राहतो. आपल्या कृषीप्रधान देशाचे सर्व शेतकरी वैभव आहेत. हे सरकार शेतकऱ्याच्या श्रमाचे मोल करणारे आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. आम्हा शहरी बाबूंना शेतीची माहिती नाही. गहू तांदूळ दुकानातून येतो एवढं आम्हाला माहित. पण शेतात शेतकऱ्यांचे हाल होतात. आम्ही वर्क फ्रॉम होम करतो, पण शेतकऱ्यांना ते शक्य नाही. संकट येतात जातात, मात्र शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय माताभगिनी तळहातावरील फोडाप्रमाणे शेती पिकवतात. राहीबाई यांनी बियाण्यांची बँक तयार केली. आपण बँक घोटाळे बघितले, पण बियाणे बँक ही कल्पनाच वेगळी आहे. आपल्याकडचे गहू-तांदूळ आरोग्यदायी आहे. अजित दादा तुम्ही शेतकरी आहेत तुम्हाला शेतीतील चांगले कळतं. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी दिसते. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी घोषणा करणारं आपलं सरकार बेशरम नाही."


कृषी योजनांचा 50 टक्के लाभ महिलांना मिळणार : दादा भुसे
बियाणे आणि खते केंद्र सरकारकडून 45 लाख मेट्रिक टन खत मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. याला केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे कोणालाही बियाणे, रासायनिक खते कमी पडणार नसल्याचे भुसे म्हणाले. कृषी योजनांचा 50 टक्के लाभ महिलांना मिळणार आहे. लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांचे नाव सातबाऱ्यावर लागणार आहे, असंही दादा भुसे यांनी सांगितलं.