Lumpy Disease Vaccine : जनावरांना होणाऱ्या लम्पी त्वचा (Lumpy Disease) रोगावर प्रतिबंधक लसीचं उत्पादन आता पुण्यात होणार आहे. केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या (Pune) या लसीचे तंत्रज्ञान सर्वप्रथम पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेकडे (आयव्हीबीपी) नुकतेच हस्तांतर करण्यात आले. ‘लम्पी प्रोव्हॅक’ या लसीचे 10 वर्ष व्यावसायिक उत्पादन घेण्याचा अधिकार महाराष्ट्राला देण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून या लसीच्या उत्पादनाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये मागील आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. एका कार्यक्रमात या लसीचं हस्तांतर महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाच्या पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेला करण्यात आलं आहे. 


1 कोटीहून अधिक जनावरांना लस


देशात सुरुवातील पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेला लसीचे तंत्रज्ञान देण्यात आले आहे, असे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितलं आहे. राज्यात एक कोटी 40 लाख गोवंशातील जनावरे आहेत. त्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासोबतच बाकी राज्यांनाही ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात लम्पी आजार रोखण्यात मदत होणार आहे. 


लसीकरणामुळे मृत्यू रोखले...


लम्पी आजार पसरण्याला सुरुवात होताच पुणे जिल्ह्यात लसीकरणावर (Vaccination) भर दिला होता. पुणे जिल्ह्यात तातडीने केलेल्या लसीकरणामुळे पशुंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आल्यामुळे जिल्ह्यातील मृत्युदर कमी आहे. राज्यात अनेक शहरात लसीकरणावर भर दिला नव्हता त्यामुळे लम्पीमुळे मृत्यू झाले. लसीकरण करा, असं आवाहन करण्यात येत होतं. योग्य उपाययोजना देखील करणं गरजेचं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केल्याने पुणे जिल्हा जनावरांचा मृत्यू रोखू शकला.


पुण्यातील परिस्थिती काय?


पुणे जिल्ह्यात लम्पी रोग रोखण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात आलं. त्यासाठी सरकारी वाहनं उपलब्ध करुन देण्यात आली. तसंच दीड लाखांहून अधिक लस खरेदी करण्यात आल्या. रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. दूध संघांनी केलेल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 650 हून जनावरे बाधित असून त्यातील 38 जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे जिल्ह्यातील हा आकडा राज्यातील आकडेवारीच्या तुलनेत कमी आहे,' असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे. लम्पीमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत पुणे जिल्हा बाराव्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले. आता पुण्यात लसीचं उत्पादन होणार असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.